जयश्री पाटील /८८७९४८४८३६
** १० कोटीचा खर्च १२ कोटीवर पोहोचला
** धारावीतील रखडलेल्या उड्डाणपुलाचे काम मार्गी लागणार
** दादरसह तीन उड्डाणपुलाची होणार डागडुजी
मुंबई :- मुंबई मेट्रो -३ च्या कामांत अडथळा ठरलेल्या धारावीतील शीव- वांद्रे लिंक रोड व संत रोहिदास मार्ग जंक्शन येथील नाल्यावरील उड्डाण पुलाचे काम मागील दोन वर्षापासून रखडले होते. आता मे्ट्रोसाठी उड्डाणपुलाचा सुधारित आराख़डा तयार करून नवीन कंत्राटदाराची निवड करण्यात आल्याने रखडलेल्या उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी व्यक्त केला.
धारावी येथील नाल्यावरील हे पूल खचल्यानंतर येथील पुलाचे काम स्थायी समितीच्या मंजुरीने २०१३ रोजी मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार पुलाच्या कामाला सुरूवातही करण्यात आली होती. परंतु हे काम सुरू असतानाच मुंबई मे्ट्रो रेल कॉर्पोरेशनने पुलाचे काम मेट्रो ३ प्रकल्पाच्या मार्गात बाधीत होत असल्याचे सांगत थांबवण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार महापालिकेने पुलाचे काम थांबवले व मेट्रो मार्गाला वगळून पुलाचा सुधारित आराख़़डा बनवला. यासाठी १० कोटी रुपयाचा अधिक खर्च येणार होता. ही १० कोटी रुपयाची रक्कम एमएमआरसीने महापालिकेकडे जमा केली. त्यामुळे नवीन आराखड्यानुसार पुलाचा खर्च अधिक असल्यामुळे जुन्या कंत्राटदाराकडून काम करून न घेता नव्याने निविदा मागवून पात्र कंत्राट कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी सुमारे १२ कोटी रुपये खर्च करण्यात आहे. तसेच ३ उड्डाणपुलांची डागडुजी आणि घाटकोपर- मानखुर्द जोड रस्त्यावरील विस्तारित उड्डाणपुलाचेही काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती फणसे यांनी दिली.