गणेश इंगवले / नवी मुंबई
आजची मुले अतिशय स्मार्ट असून त्यांच्यामधील स्मार्ट गुणांचे प्रदर्शन घडावे म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेला बालमहोत्सव मुलांच्या अत्यंत उत्साही सहभागाने यशस्वी झाला व पहिल्यांदाच आयोजित केलेल्या महोत्सव आयोजनाचा हेतू सफल झाला याचा आनंद व्यक्त करीत महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सायली शिंदे यांनी महिलांप्रमाणेच मुलांनाही सुविधा पुरविण्यासाठी समिती तत्पर आहे असे सांगितले.
महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने समाज विकास विभागामार्फत तसेच शिक्षण विभागामार्फत वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित “बाल महोत्सव” प्रसंगी त्या आपले मनोगत व्यक्त करीत होत्या. यावेळी व्यासपिठावर पाणीपुरवठा व मलनि:स्सारण समितीचे सभापती निवृत्ती जगताप, उद्यान व शहर सुशोभिकरण समितीच्या सभापती तनुजा मढवी, नगरसेविका वैशाली नाईक व संगिता बो-हाडे आणि समाज विकास विभागाच्या उप आयुक्त तृप्ती सांडभोर व सहा. आयुक्त सुभाष गायकर आदी उपस्थित होते.
सकाळी 10 वाजल्यापासून मुलांच्या हाऊसफुल्ल गर्दीत सादर झालेल्या एकाहून एक सरस कार्यक्रमांना बाल प्रेक्षकांनी टाळ्यांची कौतुकाची उत्स्फुर्त दाद दिली. बालवाडीतील छोट्या मुलांनी सादर केलेले मनोरंजक कार्यक्रम ते मोठ्या मुलांची दिमाखदार नृत्ये श्रोत्यांची दाद मिळवून गेले. गीतनृत्यामधून सादर झालेली महाराष्ट्राची परंपरा, अवघे नाट्यगृह भक्तीमय करणारी दिंडी सामुहीक प्रतिसादामुळे नामगजरात रमली. वृक्षारोपण, शेतक-यांचे प्रश्न, मुलगी वाचवा मुलगी शिकवा, सोशल मिडीयाचा अतिरेक, देशभक्ती, स्वच्छ भारत अभियानाचा संदेश असे अनेक समाज उपयोगी संदेश विविध कलाविष्कारातून मुलांनी सादर केले. याशिवाय जादूचे प्रयोग, बालनाटिका यामधूनही मुलांचे उत्तम अभिनय दर्शन घडले.
बाल महोत्सवाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या वेषभुषा स्पर्धा, नृत्य स्पर्धा, नाटिका स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धांतील विजेत्या मुलांना मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील खाजगी व महापालिकेच्या शाळांमधील 1500 हून अधिक विद्यार्थ्यांनी विष्णुदास भावे नाटयगृहात उपस्थित राहून बाल महोत्सवाचा जल्लोष साजरा केला.