नवी मुंबई महापालिकेला सुरूवातीला पहिले तीन महापौर शिवसेना पक्षाने दिले. 1990, 1995, 1999च्या विधानसभा निवडणूकीत सलग तीन वेळा आमदार नवी मुंबईकरांनी शिवसेनेचे निवडून दिले आहेत. सध्या नवी मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे तब्बल 38 नगरसेवक असून विरोधी पक्षनेते पदासह स्थायी समिती सभापतीपदही शिवसेनेकडेच आहे. नवी मुंबईत शिवसैनिकांची संख्या लाखोच्या घरात आहे. तथापि या शिवसेना संघटनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुखपद जवळपास दोन वर्षे रिक्तच आहे. 2015 साली नवी मुंबई महानगरपालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणूक झाली. ही निवडणूकदेखील शिवसेनेने जिल्हाप्रमुखांविनाच लढली. सध्याचे शिवसेनेचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी तत्कालीन परिस्थितीत जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यावर शिवसेनेला आजतागायत जिल्हाप्रमुख पदाकरता योग्य माणूस सापडलेला नाही. या पदाकरिता नवी मुंबई शिवसेनेतील काही नगरसेवक, पक्षीय पदाधिकारी गेली काही महिने गुडघ्याला बाशिंग बांधून आपल्या घरातील देवही पाण्यात ठेवून बसलेले आहेत. यापदाकरिता शिवसैनिकांमध्ये शिवसेना उपनेते विजय नाहटा, विरोधी पक्ष नेते विजय चौगुले, उपजिल्हाप्रमुख अॅड. मनोहर गायखे, गोवा राज्य शिवसेना सहसंपर्कप्रमुख व सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत, बेलापुर विधानसभा संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, माजी विरोधी पक्षनेते मनोज हळदणकर, नगरसेवक एम.के.मढवी यांच्या नावाची चर्चा जोरदारपणे सुरू आहे. पण खाडीपलिकडे बांद्रा येथे असलेल्या मातोश्रीला आणि दादर येथील शिवसेना भवनला नवी मुंबई शिवसेनेशी काहीही देणेघेणे राहीले नसल्याचे अथवा विशेष स्वारस्य राहीले नसल्याचे भिजत पडलेल्या जिल्हाप्रमुख पदाच्या समस्येवरून पहावयास मिळत आहे. राजकारणात सक्रिय असलेल्या कोणत्याही पक्षाला अथवा संघटनेला आपल्या पक्षाचे जिल्हाप्रमुख पद इतका काळ प्रलंबित ठेवणे परवडणारे नाही. त्यामुळे पक्षसंघटना खिळखिळी होण्यास, पक्षात गटबाजी निर्माण होण्यास तसेच बेबंदशाही निर्माण होण्याचा धोका निर्माण होतो. पदाधिकार्यांवर अथवा स्थानिक लोकप्रतिनिधींवर कोणाचेही नियत्रंण राहत नाही. नेमके हेच आज नवी मुंबई शिवसेनेच्या बाबतीत घडत आहे. नवी मुंबई शिवसेनेतही तीन ते चार प्रभावशाली आणि महत्वाकांक्षी गट निर्माण झाले असून या गटामध्येच नवी मुंबईची शिवसेना विखुरली गेली आहे. सध्या नवी मुंबई शिवसेनेचा कारभार खासदार राजन विचारे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हाकत असून स्थानिक भागात उपनेते विजय नाहटा आणि विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचा विशेष प्रभाव पहावयास मिळत आहे. सध्या मुंबई आणि ठाणे शहरामध्ये येवू घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणूका पाहता आणि या निवडणूकीत शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागलेली असल्याने नवी मुंबई शिवसेनेकडे शिवसेनासुप्रिमो अथवा शिवसेनेची अन्य नेतेमंडळी येथील रिक्त असलेल्या जिल्हाप्रमुखपदाचा निर्णय घेण्याविषयी फारसे स्वारस्य दाखविणार नाहीत, हे एक जगजाहिर सत्य आहे. आजही नवी मुंबईतील शिवसेनेच्या पदाधिकार्यांवर आणि नगरसेवकांवर विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचा बर्यापैकी प्रभाव असल्याचे उघडपणे पहावयास मिळत आहे. संघटनेच्याबाबतीत खर्च करण्यास विजय चौगुले कधीही हात आखडता घेत नाही व अन्य नेते इतका खर्च करण्यास स्वारस्य दाखवित नाही, असे शिवसेनेचे पदाधिकारी व नगरसेवक उघडपणे बोलत आहेत. हे रिक्त राहीलेले पद भरण्याबाबत खासदार राजन विचारे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदेनीदेखील दोन वर्षाच्या कालावधीत फारसे स्वारस्य दाखविले नसल्याची नाराजी आता शिवसैनिकांकडून उघडपणे बोलली जात आहे. एकनाथ शिंदे पालकमंत्री झाल्यावर वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहामध्ये नवी मुंबई शिवसेनेकडून त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी आपण नवी मुंबईतील शिवसैनिकांना वार्यावर सोडणार नाही. आठवड्यातून एकदा नवी मुंबईत येणार असल्याची घोषणाही केली होती. तथापि ही घोषणा ही केवळ घोषणाच राहीली. पालकमंत्री शिवसैनिकांनाच नाही तर नवी मुंबईतील शिवसेना पदाधिकार्यांच्या, शिवसेना नगरसेवकांच्या किती वेळा गाठीभेटी घेतात, हाच एक संशोधनाचा भाग आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार राजन विचारे हे नवी मुंबईत तेच मुळी कार्यक्रमानिमित्ताने. ते आल्यावर त्यांच्यासभोवताली विजय नाहटा, विठ्ठल मोरे यांच्यासह ठराविक लोकांचाच गोतावळा नेहमी असतो. कार्यक्रम संपल्यावर नामदार, खासदार पुन्हा ठाण्याला रवाना. आज जिल्हाप्रमुख पद रिक्त असल्याने खर्या अर्थांने नवी मुंबई शिवसेनेला आज वाली राहीलेला नाही. नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी वेगवेगळ्या गटामध्ये विखुरले गेले आहे. काही स्वंयभू समजणारी मंडळी स्वत:चा स्वतंत्र गट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. हे सर्व हतबलपणे व हताशपणे नवी मुंबईतील शिवसैनिक हे चित्र पहात आहे. शिवसेनाप्रमुखांची नवी मुंबईतील खिळखिळी होत चाललेली शिवसेना हा शिवसैनिक असहायपणे पहात आहे. बांद्राच्या मातोश्रीला वेळ मिळेल आणि दादरच्या शिवसेना भवनला ज्यावेळी या समस्येचे गांभीर्य लक्षाय येईल, तेव्हाच कोठे या नवी मुंबईच्या शिवसेनेला जिल्हाप्रमुख पद मिळेल. पण कदाचित तोपर्यत वेळ निघून गेलेली असेल. सध्याची कमजोर असणारी भाजपा पक्षसंघटना बळकट झालेली असेल. राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेला असेल आणि शिवसेनेला नव्याने सुरूवात करावी लागेल. शिवसैनिकांनो आता तरी आक्रमक व्हा. खासदार,नामदारांना इतका काळ रिक्त राहीलेल्या या पदाबाबत जाब विचारा . नाही जमलेच तर सोशल मिडीयावर आपला आवाज इतका बुलंद करा की खाडीपलिकडे असलेल्या मातोश्रीला अथवा शिवसेना भवनलाही आपल्या समस्येची व्यथा कळेल.