संजय बोरकर / नवी मुंबई
आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्ट, नवी मुंबई तर्फे भरविण्यात येणारा ‘आगरीकोळी महोत्सव’ ४ जानेवारी पासून नेरुळ सेक्टर- १२ मधील श्री गणेश रामलिला मैदानावर सुरु होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन ठाणे जिल्हा पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून, ‘आगरी-कोळी महोत्सव’ येत्या १५ जानेवारी २०१७ पर्यंत चालणार आहे.
गोवा राज्याचे शिवसेना सहसंपर्कप्रमुख शिवसेना नगरसेवक आणि माजी सिडको संचालक नामदेव भगत यांच्या मार्गदर्शनाखाली नेरुळमध्ये ‘आगरीकोळी महोत्सव’ गेल्या ११ वर्षांपासून आयोजित करण्यात येत आहे. नवी मुंबईतील सर्वाधिक गर्दी खेचणारा महोत्सव म्हणून या महोत्सवाची ओळख आहे. या महोत्सवात प्रत्येक दिवशी नागरिकांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये नामवंत कलाकार सहभागी होणार असून, त्यांचे कार्यक्रम प्रेक्षकांसाठी विनामुल्य उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
‘आगरी-कोळी महोत्सव’मध्ये खाद्यपदार्थ, मासळी, कोकणी मेवा यांचे १२० स्टॉल लागणार आहेत. याशिवाय बच्चे कंपनीसाठी भव्य फनफेअर आणि खवय्यांसाठी खास आगरी-कोळी पद्धतीच्या जेवणाची मेजवानी असणार आहे. याबरोबर १० दिवस आगरी-कोळी गीतांचा तडका उपस्थितांचे मनोरंजन करणार आहे. आगरी-कोळी समाजातील व्यावसायिकांना प्रोत्साहन देणे आणि कोकणी मेव्याला बाजार पेठ उपलब्ध करून देणे, या उद्देशाने महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. महोत्सव ठिकाणी आगरीकोळी समाजातील पारंपारिक अवजारांचे प्रदर्शन भरविले जाणार आहे. तरूण पिढीला आपल्या परंपरेची माहिती व्हावी, या उद्देशाने महोत्सवमध्ये गावदेवी माता, एकविरा आई, भवानी माता, खंडोबा या दैवतांची प्रतिष्ठापणा केली जाणार आहे, अशा माहिती ‘आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्ट’चे अध्यक्ष नगरसेवक नामदेव भगत यांनी दिली.
नवी मुंबई शहरातील ग्राम संस्कृती, लोककला आणि लोक परंपरेचे जतन व्हावे, जुन्या जाणत्या कलावंतांचा गौरव व्हावा, नवोदित कलावंतांच्या सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, नव्या विकासाबरोबर प्रवाहात येणार्या नवी मुंबईतील नागरी संस्कृतीला येथील मूळ संस्कृती कळावी, ग्राम संस्कृती आणि नागर संस्कृती यांच्यामध्ये विचारांचे आदान -प्रदान होऊन खर्या अर्थाने सांप्रदायिक एकात्मता वृंधिंगत व्हावी, याच उदात्त हेतूने ‘आगरीकोळी महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे, असे नगरसेवक नामदेव भगत यांनी सांगितले.
आगरी-कोळी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, मोरेश्वर पाटील, पी.सी.पाटील, मनोहर पाटील, डॉ. राजेश पाटील, वैभव नाईक, रमेश पाटील, जयश्री पाटील,रमेश पाटील, जयश्री पाटील, निलेश पाटील, पंढरीनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.