लोकनेते गणेश नाईक होणार सहभागी
नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटबंदीचा निर्णय फसला असून त्यामुळे शेतकरी, नोकरदार, व्यापारी अशा सर्वच वर्गाला त्याचा मोठा आर्थिक फटका बसत असून या नोटबंदीमुळे देशातील ४००पेक्षा जास्त नागरिकांनी बँकेतील पैसे काढण्यासाठी लावलेल्या रांगेत आपले प्राण गमावले असल्याचे सांगत नोटबंदीमुळे जनतेला झालेल्या प्रचंड त्रासाचा निषेध करण्यासाठी नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सोमवार ९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सीबीडी-बेलापूर येथील कोकण भवन मुख्यालयाच्या बाहेर जनआंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. हे जन आंदोलन लोकनेते गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली होणार असल्याचे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
पत्रकार परिषदेला माजी महापौर सागर नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष जब्बार खान, सेवादल सेलचे अध्यक्ष दिनेश पारख आदी मान्यवर उपस्थित होते.
नोटबंदीचा निर्णय घेतल्यावर ५० दिवसात परिस्थिती बदलेल असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी यांनी देशातील नागरिकांना दिले होते परंतु ५० दिवस उलटूनही परिस्थिती बदलली नसून त्याचा त्रास नागरिकांना होत असल्याचे जिल्हाध्यक्ष सुतार म्हणाले.
नोटबंदीच्या निर्णयानंतर मोदींनी सर्व व्यवहार कॅशलेस करण्याचे नागरिकांना आवाहन केले. त्यानुसार नोकरदार वर्गाला मिळणारा पगार देखील त्यांच्या बँकेत असणार्या खात्यांवर टाकण्यात आला. मात्र बँकांमधील मोठया रांगांमुळे नोकरदारांना पैसे काढण्यासाठी सुटट्या घ्याव्या लागत असल्याचे सुतार म्हणाले. बँकेतील पैसे काढण्यासाठी लागलेल्या रांगेत अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. नोटबंदीमुळे नागरिकांना होत असलेला त्रास कमी झाला पाहिजे याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे जन आंदोलन करणार असल्याचे सुतार यांनी सांगितले.
नोटबंदीमुळे उद्भवलेले संकट आणि जनसामान्यांना होणार त्रास त्याचबरोबर विस्कळीत झालेले जनजीवन याच्या निषेधार्थ्र हे जनआंदोलन करण्यात येणार असल्याचे माजी महापौर सागर नाईक यांनी सांगत सरकारच्या या निर्णयाविरोधात नागरिकांच्या भावना किती तीव्र आहेत हे या आंदोलनात दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नोटबंदीमुळे मागील वर्ष सर्वांच्या अडचणीत भर टाकून संपले. तशीच सुरुवात नवीन वर्षाची देखील झाली असल्याची टीका महापौर सुधाकर सोनावणे यांनी केली. पंतप्रधानांनी जे कारण सांगून नोटबंदीचा निर्णय घेतला त्याचे आम्ही सर्वानी स्वागतच केले परंतु त्यांनी ५० दिवसात परिस्थिती सुधारेल असा विश्वास देशातील जनतेला दिला होता मात्र तसे काहीही घडले नाही उलट अजूनही जनतेचा त्रास कमी झालेला नाही. त्यामुळे जनआंदोलन करण्यात येणार असल्याचे महापौर सोनावणे म्हणाले. कॅशलेसचा फायदा आणि तोटा या दोन्ही गोष्टी समजावून घेणे गरजेचे असून नोटबंदीमुळे मजुरांना मजुरी मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याची टीका त्यांनी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या आदेशाने आणि लोकनेते गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या जन आंदोलनात नवी मुंबईकरांनी देखील मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे करण्यात आले आहे.