केडीएमसी प्रशासनाची नगरविकास विभागाला माहिती
प्रकल्प उभारणीबाबत विलंब झाल्याबद्दल प्रशासनाची कानउघडणी
कल्याण : ऐतिहासिक कल्याण शहरात प्रवेश करणाऱ्या नागरिकांचे घाणेरड्या उग्रवासाने स्वगात करणाऱ्या आधारवाडी डंपिंग ग्राउंडची जागा येत्या २ वर्षात बगीचा घेणार असल्याची माहिती केडीएमसी प्रशासनाने नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांना दिली. कल्याणकरांच्या आरोग्याला विविध आजारांचे ग्रहण लावणाऱ्या आधारवाडी डंपिंग ग्राउंडमधून सुटका होण्यासाठी आणि तातडीने घनकचरा विघटन प्रकल्प उभारणीच्या कामाला गती मिळण्यासाठी भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. यादृष्टीने केडीएमसी प्रशासनाने केलेल्या उपायोजानाचा आढावा घेण्यासाठी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या दालनात बुधवारी विशेष बैठक पार पडली. या बैठकीत आमदार नरेंद्र पवार यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना या प्रकल्प उभारणीत झालेल्या विलंबाबाबत धारेवर धरले.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात दरोरज तब्बल ६०० मेट्रिक टन निर्माण झालेला घनकचरा संकलित करून कल्याण पश्चिमेतील आधारवाडी डंपिंग ग्राउंडवर टाकला जातो. या डंपिंग ग्राउंडची कचरा सामावून घेण्याची क्षमता संपल्यामुळे सदरचे डंपिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करून घनकचरा विघटन – प्रक्रिया उद्योग उभारण्याचे आदेश उच्च न्यायालयाने केडीएमसी प्रशासनाला दिले आहेत. मात्र तरी देखील आज हि न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता याच डंपिंग ग्राउंडवर कचरा टाकण्याचे काम पालिका प्रशासनाचे बिनधाक्तपणे सुरूच आहे. या डंपिंग ग्राउंडच्या उग्र घाणेरड्या दर्पामुळे डंपिंग ग्राउंडच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना जगणे मुश्कील झाले आहे. याबाबत तातडीने पाऊले उचलून घनकचरा विघटन – प्रक्रिया प्रकल्प उभारून सदरचे डंपिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने कायमस्वरूपी बंद करण्यासाठी भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार प्रयत्नशील आहेत. याबाबत त्यांच्याच माध्यमातून नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला केडीएमसीचे अधिकारी चंद्रकांत कोलते आणि शासनाचे नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान या बैठकीत आमदार नरेंद्र पवार यांनी आधारवाडी डंपिंग ग्राउंडची समस्या मांडताना नागरिकांच्या आरोग्याला निर्माण झालेल्या धोक्याबाबत नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे लक्ष वेधले. सदरचे डंपिंग बंद करण्यासाठी केलेल्या उपाययोजनाबाबत आणि कामाच्या गतीबाबत नाराजी व्यक्त करीत केडीएमसी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना चांगलीच कान उघडणी केली. यावर स्प्ष्टीकरण देताना सदरचे डंपिंग शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी आणि प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती राज्यमंत्री रणजीत पाटील आणि आमदार नरेंद्र पवार यांना दिली. त्याचप्रमाणे याबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ठेकेदाराला कार्यादेश देऊन पुढील २ वर्षाच्या कालावधीत डंपिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करून या ठिकाणे बगीचा विकसीत केला जाणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील आणि आमदार नरेंद्र पवार यांनी सदरचे प्रकल्प तातडीने पूर्ण करून आधारवाडी डंपिंग ग्राउंडच्या जाचातून नागरिकांची तातडीने सुटका करण्याचे आदेश केडीएमसी प्रशासनाला दिले.