नवी मुंबई / अनंतकुमार गवई :
डेब्रिजचा घोटाळा सतत गाजत असतो. एम आय डी सीच्या उद्यानासाठी राखीव असलेल्या भूखंडावर एका उपायुक्ताने अवघ्या काही दिवसात डेब्रिज टाकायला परवानगी नाकारली तर दुसर्या उपायुक्तांनी पुन्हा या जागेवर डेब्रिज टाकायला परवानगी दिली यामागील गौडबंगाल काय आहे. डेब्रिज माफियांना लाल गालिचा अंथरून वाव देणारे झारीतील शुक्राचार्य या मनपाच्या आवारात अतिक्रमण अधिकार्यांच्या दालनात अगदी मनसोक्त सैर करत असतात. नावाला डेब्रिजचे भूखंड जप्त करायची कारवाई करायची आणि डेब्रिजचीवाहतूक बिनभोभाट सुरु ठेवायची . यामध्ये काही घटकांना मलिदा मिळायची सोय असल्याचे बोलले जाते.
तुर्भे एम आय डी सी मध्ये ओम साई अर्थ मूव्हर्स याना गत वर्षी एप्रिल महिन्यात ९ डम्पर टाकण्यास तत्कालीन उपायुक्त सुभाष इंगळे यांनी परवानगी दिली होती. मात्र ज्या जागेवर हि परवानगी देण्यात आली होती. ती जागा मनपाच्या उद्यानासाठी राखीव असल्याचे समोर आले होते. मात्र डेब्रिज माफिया या अधिकार्यांना गुंडाळण्यात यशस्वी झाल्याने हि परवानगी त्याना मिळाली. तुर्भ्याच्या डी ब्लॉक मध्ये वाहतुकीसाठी दिलेल्या परवानगीच्या नावाखाली हा खेळ सुरु होता. त्या पूर्वी मार्च २०१५ मध्ये अशीच परवानगी सिद्धिविनायक ट्रान्सपोर्ट याना देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे . १८ डम्परसाठी हि परवानगी देण्याची करामत तत्कालीन अतिक्रमण उपायुक्तांनी केली होती. त्या नंतर दोन महिन्यात इंगळे यांनी परवानगी देऊन टाकली. यानंतर सुभाष इंगळे यांनी पुन्हा प्रभारी पदाची कारकीर्द संपल्यावर मंत्रालयाची वाट धरल्यावर त्यांच्या जागी सध्या प्रभारी अतिक्रमण उपायुक्त काम करत आहेत. त्यांनी सुद्धा आता अचानक हि परवानगी कायम ठेवण्यात धन्यता मानली आहे. मात्र या विषयावर थोडा गोंधळ झाला आणि सध्याच्या उपायुक्तांनी अचानक परवानगीला स्थगिती दिली आहे. मनसेच्या काही पदाधिकार्यांनी २०१५ मध्ये थातुर मातुर आंदोलन करून लटका विरोध केला होता. या विरोधानंतर काही राजकीय कामगार नेत्यांच्या शिष्टाई नंतर हे आंदोलन पदरात दान पडल्याने मागे घेतले गेले. या डेब्रिज मध्ये सहभागी असणार्या एका माफियाने तत्कालीन विरोधाची पक्षनेत्याला धमकावण्याची घटना घडली होती. या डेब्रिज माफियांच्या बगलबच्चयाला डेब्रिज टाकण्यासाठी परवानगी दिली आहे. एम आय डी सी मध्ये परवानगी देताना गोंधळ खूप असतात एम आय डी सीचे जुने कार्यालय असलेल्या जागेवर परवानगी देताना हा भूखंड मोकळा आहे कि नाही तपासण्याची तसदी मनपा अधिकार्यांनी घेतली नव्हती. अश्याच प्रकरणात लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात अडकवून पालिकेच्या एका अधीक्षक दर्जाच्या अधिकार्याचा बळी घेण्यात आला आहे. सध्या हा अधिकारी निलंबित असल्याचे समजते. तुर्भे येथील विभाग अधिकारी भरत धांडे यांनी एम आय डी सी मध्ये रीती होणारी वाहने जप्त केली होती. या डेब्रिज घोटाळ्यात अनेक मोठ्या नेत्यांचा थेट सहभाग असल्याने डेब्रिज माफिया सोकावले आहेत. मात्र आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आद्यपि कोणत्याही डेब्रिज माफियाला दणका दिल्याचे दिसून आलेले नाही. यामुळेच डेब्रिजचे कैलास पर्वत एम आय डी च्या भूखंडावर पर्यावरणाला हानी पोहोचवत आहेत .