** राज ठाकरे यांची अवस्था म्हणजे बाबा लगीन अशा धोशा लावणार्या चित्रपटातील व्यक्तिरेखेसारखी.
मुंबई / प्रतिनिधी
मुंबई-ठाणे महानगरपालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपाचे संबंध कमालीचे ताणले जात असून केंद्रात व राज्यातील सत्तेत एकत्र असणारे हे पक्ष कोणत्याही थराला लावून एकमेकांवर टीका करत आहे. मुंबई-ठाणे महापालिका निवडणूकानंतर शिवसेना-भाजपातील संबंधांवर कायमचेच प्रश्नचिन्ह उभे राहण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.
नोटाबंदीचा फटका देशातील महिला वर्गाला बसत असल्याचा दावा करत नुकताच प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट ‘ती सध्या काय करते’ या शीर्षकावरून त्यांनी ती सध्या ५० दिवसानंतरही बँकेच्या रांगेत उभी असल्याची उपहासात्मक टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ’सामना’तून करण्यात आली होती.
नोटाबंदीच्या मु्द्यावरून भाजपवर मार्मिक शब्दांत भाजपवर टीका करणार्या शिवसेनेला भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी तोडीस तोड प्रत्युत्तर दिले आहे. ते सोमवारी मुंबईच्या लालबाग परिसरातील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी शेलार यांनी ‘ती सध्या काय करते’ या सेनेच्या खोचक प्रश्नाला ‘ती सध्या सर्व प्रकल्पांना विरोध करते’, असे प्रत्युत्तर दिले.
नोटाबंदीचा फटका देशातील महिला वर्गाला बसत असल्याचा दावा करत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटाच्या शीर्षकावरून त्यांनी ती सध्या ५० दिवसानंतरही बँकेच्या रांगेत उभी असल्याची उपहासात्मक टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना शेलार यांनी सध्या तुम्ही काय करता?, असा प्रतिप्रश्न सेनेला विचारला. तसेच गेल्या काही दिवसांत भाजपच्या प्रत्येक निर्णयाला आणि प्रकल्पाला विरोध करण्याच्या सेनेच्या भूमिकेवरून ‘ती सध्या सर्व प्रकल्पांना विरोध करते’, अशी खोचक शेरेबाजीही केली. यावेळी शेलार यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनाही लक्ष्य केले. निवडणुकांचे बिगुल वाजले किंवा भाजपने कोणताही घोषणा केली की राज ठाकरे, हा मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, अशा धोशा लावतात. त्यांचे हे वर्तन म्हणजे एका मराठी चित्रपटातील ‘बाबा लगीन’, अशा धोशा लावणार्या व्यक्तिरेखेसारखे आहे, असे सांगत शेलार यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडविली. तसेच युवा सेनेचे प्रमुख असणार्या आदित्य ठाकरे यांचे बोलणे फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नसून त्यांची परिस्थिती म्हणजे ‘नया है वह’, अशी असल्याचे शेलार यांनी सांगितले.
नोटाबंदीमुळे देशातील महिलावर्गाला झगडावे लागत असल्याचे सांगत ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर आसूड ओढण्यात आले होते. भविष्याच्या चिंतेते या महिलांना ग्रासले आहे. नोटबंदीच्या रांगेत आई, पत्नी, बहीण, आजी व नातीच्या रूपातील महिला मूक आणि बधिर होऊन रांगेत उभी असल्याचा टोला सेनेने लगावला होता. कॉंग्रेस राजवटीत जे भोगायला लागले नाही. ते स्वकीयांच्या राजवटीत भोगावे लागत आहे. नोटाबंदीमुळे बाजारपेठ मंदावली आहे. आर्थिक विकासाचा वेग कमी झाला आहे. त्याचा फटका अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायांना बसला असल्याचे सेनेने या अग्रलेखात म्हटले होते.