नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळ गाभा क्षेत्रातील होत असलेल्या नवीन बांधकामांना कोणत्याही प्रकारचे पुनर्वसन पॅकेज व सुविधा देण्यात येणार नसल्याचे सिडकोतर्फे जाहीर करण्यात येत आहे. अशा बांधकामांना सिडकोतर्फे कोणतेही अभय देण्यात येणार नाही.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाभा क्षेत्रातील 10 गावातील सर्व घरांचे सर्वेक्षण पूर्ण होऊन सदर प्रकल्पबाधितांना शासनमान्य पुनर्वसन पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. या प्रकल्पबाधितांसाठी सोडत काढून वडघर, वहाळ व कुंडे वहाळ या ठिकाणी भूखंड निश्चित करण्यात आले आहेत. सर्वेक्षणामध्ये तयार करण्यात आलेल्या अंतिम यादीप्रमाणे पॅकेजमध्ये नमूद करण्यात आलेल्या मुद्द्यांनुसार पुनर्वसन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे मागील महिन्यात प्रकल्पबाधितांसोबत पार पडलेल्या बैठकीमध्ये शून्य पात्रतेसंबंधितदेखील निर्णय घेण्यात आला असून त्या अनुषंगाने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्रामध्ये काही नागरीक नव्याने बांधकाम करत असल्याचे मागील काही दिवसांपासून सिडकोच्या निदर्शनास आले आहे. अशा नागरीकांना सूचित करण्यात येत आहे की त्यांना कोणत्याही प्रकारचे पॅकेज अथवा सुविधा देण्यात येणार नाहीत. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्रात कोणतेही नवीन बांधकाम करू नये असे सिडकोतर्फे आवाहन करण्यात येत आहे.