नवी मुंबई महापालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार
नवी मुंबई: निविदा प्रक्रियेतील गोंधळामुळे शाळा सुरू होऊन आठ महिने झाले, तरी अद्यापही नवी मुंबई महापालिकेच्या शाळेतील ३५ हजार विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्य मिळालेले नाही. गणवेश आणि साहित्य वाटपाबाबत शासनाने ५ डिसेंबर रोजी जाहिर केलेल्या नव्या अध्यादेशानुसार सदर साहित्यांचे पैसे विद्यार्थांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. त्यासाठी पालकांसोबत संयुक्त खाती उघडण्यात येणार आहेत. त्याची तयारी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने सुरू केली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी संदीप सांगवे यांनी दिली.
गणवेश आणि शालेय वस्तुंच्या किंमतीतील घोळामुळे सुरुवातीची निविदा प्रक्रियाच महापालिकेने रद्द केली. त्यानंतर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सहा वस्तुंची नवीन निविदा स्थायी समितीत मंजूर करून घेतली. तरीही आजपर्यंत विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले आहेत. महापालिकेच्या शाळेतील पहिली ते आठवीच्या प्राथमिक विभागात ३१ हजार, तर माध्यमिक शाळांमध्ये नववी, दहावीचे पाच हजार विद्यार्थी आहेत. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दोन गणवेश, दफ्तर, रेनकोट, बुट, मोजे, पी.टी. गणवेश, स्काऊट गाईड गणवेशही दिला जातो. नववी आणि दहावीच्या मुलांना दोन गणवेश, बूट, दोन मोजे, वह्या आणि पुस्तके दिली जातात. परंतु, चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना गणवेश आणि अन्य शालेय वस्तू मिळालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये याबाबत नाराजी आहे. दुसरीकडे आता सरकारनेच गणवेश आणि शालेय साहित्य देण्याऐवजी त्याचे पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश डिसेंबर रोजी दिले आहेत. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना या वर्षापासूनच पैसे दिले जाणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांची खाती उघडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परिणामी, या व्यवहारात पारदर्शकता येणार असल्याचे शिक्षणाधिकार्यांचे म्हणणे आहे.
महापालिका शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांना गणवेश पुरवठ्याचा घोळ अखेर मिटला आहे. आता विद्यार्थ्यांना मनपसंत कापडाचा गणवेश घेता येईल. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश आणि साहित्याची निविदा नव्याने महासभेत मंजूर करून बँक खात्यात जमा करावे लागणार आहेत. यंदा साधारण दोन हजार विद्यार्थी दहावीला आहेत. त्यांची परीक्षा सुरू होण्यापूर्वी सदर पैसे महापालिकेला त्यांच्या खात्यात जमा करावे लागणार आहेत.