मनसे चित्रपट सेनेचे आयुक्तांना पत्र
नवी मुंबई : नवी मुंबईतील एकमेव अशा विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या समस्यांसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली असून, नवी मुंबई मनसे चित्रपट सेनेच्या वतीने आयुक्त श्री.तुकाराम मुंढे व शहर अभियंता श्री.मोहन डगांवकर यांच्याकडे विष्णुदास भावे नाट्यगृहाचा विकास आराखडा जाहीर करा व २०१४ पासून आत्तापर्यंत नाट्यगृहाच्या डागडुजीसाठी वापरल्या गेलेल्या निधीचा तपशील जाहीर करण्याची मागणी नवी मुंबई मनसे चित्रपट सेना शहर संघटक श्रीकांत माने यांनी निवेद्नानाद्वारे केली आहे.
तत्कालीन नवी मुंबई मनपा आयुक्त श्री.दिनेश वाघमारे यांनी नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष श्री.गजानन काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाबरोबर जुलै २०१५ साली संपूर्ण विष्णुदास भावे नाट्यगृहाचा पाहणी दौरा केला होता. या दौऱ्यावेळी नाट्यगृहाच्या अनेक त्रुटी व दुरावस्था आढळून आल्या होत्या. मनसेच्या या पाठपुराव्यानंतर मनपा प्रशासनातर्फे त्याकाळी नाट्यगृहाच्या डागडुजीसाठी निधी उपलब्ध करून देऊ व नव्याने नाट्यगृहासाठी विकास आराखडा सादर करू असे आश्वासन त्यावेळी मनपा आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले होते. मात्र तरीही सद्यस्थितीत नाट्यगृहाच्या परिस्थितीत काही थोडे बदल झाले असले तरी अपेक्षित ते बदल झालेले नसल्याचे श्रीकांत माने यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
कलाकार आणि प्रेक्षक यांना जोडणारा दुवा म्हणजे नाट्यगृह. प्रेक्षक रसिक २००/३०० रुपयांची तिकीट काढून आज नाटक बघायला येतात. त्यामुळे त्यांची अपेक्षा असते की आपल्याला चांगल्या सुविधा मिळाव्यात. मात्र विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये प्रेक्षकांसाठी असणाऱ्या सुविधांची बिकट अवस्था असून एक ना अनेक समस्यांना प्रेक्षक रसिकांना सामोरे जाव लागतंय. त्यामुळे मग तो नाटकाकडे वळणार कसा ? असा खडा सवाल मनसेने नवी मुंबई मनपा आयुक्त व शहर अभियंत्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. तसेच या समस्यांमुळे प्रेक्षक वर्ग सर्व सुविधायुक्त मल्टीप्लेक्सना का पसंती देणार नाहीत असे देखील मनसेने पत्रात म्हटले आहे. रसिकांबरोबरच कलाकारांच्या ग्रीनरुम्सची व कलाकार रुम्सची परिस्थिती वाईट असल्याकारणाने कित्येक नाट्य कलाकारांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे.
मात्र या सगळ्या बाबींकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेले एक ते दीड वर्षे या नाट्यगृहाच्या समस्यांबाबत मनपा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने वरवरची डागडुजी करण्यासाठी २०१४ या वर्षात ५० लाखांच्या निविदा काढल्या. या काळात उपलब्ध झालेल्या लाखो रुपयांचा निधी खर्च करून सुद्धा नाट्यगृहाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे मनसेने मनपा प्रशासनास निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे जुलै २०१५ पासून नाट्यगृहावर खर्च करण्यात आलेला निधी व त्यासाठी प्रशासनाकडून तयार करण्यात आलेला विकास आराखडा नवी मुंबईकरांसाठी खुला करावा अशी मागणी चित्रपट सेनेने लावून धरली असल्याचे श्रीकांत माने यांनी म्हटले आहे.
विष्णुदास भावे नाट्यगृहाची परिस्थिती जोवर सुधारत नाही तोवर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना आपले प्रयत्न सुरूच ठेवणार असून गरज पडल्यास नाट्यगृह, प्रेक्षक व कलाकारांच्या समस्यांसाठी आंदोलन करण्याचा इशारा देखील शहर संघटक श्रीकांत माने, उपशहर संघटक प्रसेनजीत भालेराव व अनिकेत पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मनपा प्रशासनाला दिला आहे.