नवी मुंबईः अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी कळंबोली पोलिसांनी अटक केलेल्या तसेच गत २० दिवसांपासून तळोजा जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका आरोपीचा जेलमध्ये मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
सरबजीतसिंग दारासिंग गाखल (५०) असे या कैद्याचे नाव असून तो अंमली पदार्थाच्या आहारी गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. खारघर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.
सदर घटनेतील मृत सरबजीतसिंग अफु आणि कोडाईन पावडर बनवून ती विक्री करीत होता. तसेच तो सदर अंमली पदार्थाचे सतत सेवन देखील करत होता. त्युमळे तो अंमली पदार्थाच्या आहारी गेला होता. याचदरम्यान गत २९ जानेवारी रोजी कळंबोली पोलिसांनी त्याला अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. त्यावेळी पोलिसांनी त्याच्याजवळून सुमारे २ लाख ६३ हजार रुपयांची अफु आणि कोडाईनची पावडर जप्त केली होती. त्यावेळी परबजीतला सत्र न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याची
तळोजा जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती, अशी माहिती कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. पोपेरे यांनी दिली.
मात्र, सरबजीत अफु आणि कोडाईन या अंमली पदार्थाच्या आहारी गेल्याने तसेच त्याला तळोजा जेलमध्ये गेल्यानंतर सेवन करण्यासाठी अंमली पदार्थ न मिळाल्याने तो जेलमध्ये आजारी पडला होता. त्यामुळे त्याला जेलमधील रुग्णालयात ७ फेब्रुवारी रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दोन वेळा उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यानंतर देखील त्याच्यावर जेलमधील रुग्णालयात नियमित उपचार सुरु होते. मात्र, १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास सरबजीतचा जेलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सरबजीतच्या मृत्युनंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे.रुग्णालयात पाठविण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक वळवी यांनी दिली.