मनसेच्या प्रयत्नांना यश, महापालिकेचे मनसेला पत्र
साईनाथ भोईर
़नवी मुंबई : नवी मुंबईतील नाट्यप्रेमींसाठी असलेल्या एकमेव अशा वाशी स्थित विष्णुदास भावे नाट्यगृहातील सोयी-सुविधांचा मुद्दा नवी मुंबई मनसेने सातत्याने लावून धरला होता. तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे यांना घेऊन मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी नाट्यगृहाचा पाहणी दौरा ही केला होता. मात्र नंतर तात्पुरती डागडुजी पलीकडे काहीही झाले नसल्याकारणाने विष्णुदास भावे नाट्यगृहाचा विकास आराखडा जाहीर करण्याची मागणी मनसे चित्रपट सेनेने आयुक्त तुकाराम मुंढे व शहर अभियंता मोहन डगावकर यांच्याकडे केल्यानंतर विकास आराखडा जाहीर करून नाट्यगृहात काय काय सुधारणा करणार अशा आशयाचे पत्र महापालिकेने मनसेला पाठविले असल्याचे चित्रपट सेना शहर संघटक श्रीकांत माने यांनी म्हटले आहे.
या पत्रानुसार विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये सुधारणा करण्याचे काम प्रस्तावित असून त्यासाठी सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली असल्याचे म्हटले आहे. (तरतुदीची रक्कम जरी पत्रकात नसली तरी बजेट पुस्तिकेत ती जवळपास ५ कोटी आहे). त्याबरोबरच सुधारणा करण्याच्या प्रस्तावित अंदाजपत्रकामध्ये नाट्यगृहात नवीन खुर्च्या बसविणे, आधुनिक पद्धतीची लाईट व्यवस्था करणे, नवीन आधुनिक साऊंड सिस्टीम बसविणे, प्रोजेक्टर बसविणे, फूड प्लाझा/ कॅफेटेरिया तयार करणे, इंटिरियरची काम करणे व प्रदर्शन गॅलरीची सुधारणा करणे इत्यादी कामे करण्याचे प्रस्तावित असल्याचे महानगरपालिकेने पत्रात म्हटले असल्याचे नवी मुंबई चित्रपट सेना चिटणीस भालचंद्र माने यांनी सांगितले आहे.
महापालिकेच्या या पत्राने आमचे तात्पुरते समाधान झाले असले तरी कायमस्वरूपी संतुष्टता झाली नसल्याचे मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी म्हटले आहे. या सगळ्या बाबींमध्ये A.C. प्लांटचा मुद्दाच नाही आहे. A.C. प्लांट अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाला असून त्याचा कधीही स्फोट होईल अशी भीती आहे. त्याचबरोबर G+2 च्या या नाट्यगृहाच्या इमारतीत लिफ्ट बसवणार की नाही याचा उल्लेखच पत्रात नसल्याने मनसेने आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याचबरोबर २०१५-१६/ २०१६-१७ या वर्षांत नाट्यगृहाच्या सुधारणांवर किती खर्च झाला याचा तपशील मनपाने अजून जाहीर केला नाही. असे अनेक मुद्दे मनसे चित्रपट सेना पुढेही लावून धरेल व एक अत्याधुनिक सोयी-सुविधा युक्त नाट्यगृहात याचे रुपांतर झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे नवी मुंबई मनसे चित्रपट सेनेचे चिटणीस शैलेश भुतडा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.