संजय बोरकर/ 98699666144
नवी मुंबई : कामगारांच्या समस्यांकडे आणि असुविधांकडे महापालिका प्रशासन लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनच्या वतीने 30 मार्च रोजी महापालिकेच्या कोपरखैराणे विभाग कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहेत.
नवी मुंबई म्युनिसिपल मजदुर युनियन निर्णय कमिटीचे शिष्टमंडळ 30 मार्चला दुपारी 3 वाजता कोपरखैरणे वार्ड ऑफिसवर आपल्या प्रलंबित समस्यांसाठी निदर्शने करणार आहे.
फेब्रुवारी 2017 पर्यंतच्या पीएफ भरल्याच्या पावत्या त्वरीत देण्यात याव्यात, आतापर्यंतची ग्रॅज्युएटीची किती रक्कम जमा आहे, त्याची माहीती कामगारांना देण्यात यावी, प्रत्येक पंपहाउसवर पालिकेचे तक्रारबुक ठेवण्यात येऊन त्याची अधिकारांनी वेळोवेळी तपासणी करुन कामगारांच्या तक्रारी सोडवाव्यात, दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत पगार कामगारांच्या खात्यांत जमा करण्यात यावा , प्रत्येक जलकुंभावर सुरक्षारक्षक नेमण्यात यावेत, समान काम समान वेतनातील त्रुटी दूर करुन फरकासह समान वेतन लागु करण्यात यावे, कोर्ट केसमधील 62 पंपऑपरेटर कामगारांना कायम करणे,
पंप हाऊस आवारातील मोकळ्या जागांवर कामगारांसाठी अल्प भाडेतत्वावर घरे उपलब्ध करुन द्यावीत, आदी मागण्या पाणीपुरवठा विभागातील कामगारांच्या वतीने पालिका प्रशासनाकडे करण्यात येणार असल्याची माहिती नरेंद्र वैराळ यांनी दिली.