सानपाडा गावातील कांबळे कुटुंबियांची व्यथा.
नवी मुंबई / अनंतकुमार गवई
फेब्रुवारी महीन्यातील गारवा लुप्त झाला असुन मार्च मध्येच उष्म्याला प्रारंभ झाल्याने कडक उन्हाचे चटके सर्वत्र जाणवु लागले आहेत. नवी मुंबई शहरात याचा प्रत्यय येत आहे.गरम हवा व कडक उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांची थंड गोड उसाचा रस पाजून तहान भागवण्याचे काम सानपाडा गावातील कांबळे कुटुंबिय करत आहे. वाढत्या उष्मामुळे उसाच्या रसाला प्रचंड मागणी आहे. रस काढण्यासाठी लागणारा उस ते नवी मुंबईतल्या व्यापाऱ्यांकडून ६०० रुपये क्विंटल दराने जागेवर खरेदी करतात.कांबळे कुटुंबीय १० रुपयाला एक ग्लास उसाचा रस अशा स्वस्त दरात उसाचा रस विक्री करतात.सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत उसाचा रस काढण्याचे काम केले तर तेव्हा कुठे त्यांना पोटा-पाण्यापुरते पैसे मिळतात.
दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाडा सारख्या भागातील मुळचे हिंगोली जिल्ह्यात राहणारे कांबळे कुटुंबीय. गरिबीमुळे अशिक्षित असलेले कांबळे कुटुंबीय पोटाची खळगी भरण्यासाठी अकरा वर्षापूर्वी नवी मुंबईतील सानपाडा गावात वास्तव्यास आले.अशिक्षित असल्यामुळे काम मिळेल तिकडे मोल मजुरी करून कांबळे कुटुंबीयांनी गेली ९ वर्ष आपला उदरनिर्वाह चालविला.आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी गेल्या एक दोन वर्षापासून उसाच्या लाकडी गाडीवर आपल्या संसाराचा गाडा हाकण्याचे काम सानपाडा गावात राहणाऱ्या भिमराव कांबळे हे करीत आहेत. भिमराव कांबळे यांचा वडील,पत्नी,एक मुलगी,दोन मुले असा परिवार आहे.वडील वयोमानामुळे आजारी असल्याने जाग्यावरच बसून आहेत.पत्नी अशिक्षित असून घरातील काम करून करून त्यांना त्यांच्या कामात हातभार लावण्याचे काम करते.मुलगी महाविद्यालयात शिकत आहे.मोठा मुलगा इयत्ता 9 वी आणि लहान मुलगा इयत्ता 7 वी मध्ये शिकत आहे. गरिबीमध्ये आयुष्य घालवलेले भिमराव कांबळे सानपाडा गावात भाड्याच्या घरात आपल्या कुटुंबियांसोबत राहत आहेत. त्यामुळे घराचे भाडे,मुलांच्या शिक्षणाचा खर्च,वडिलांच्या आजारपणाचा खर्च,घरातील राशन यासाठी महिनाकाठी लागणारे पैसे यांची जुळवाजुळव करताना भिमराव कांबळे व त्यांच्या कुटुंबियांना तारेवरची मोठी कसरत करावी लागत आहे.संसाराचा गाडा हाकत असताना कांबळे कुटुंबियांवर अनेकदा उपासमारीची वेळ येत आहे.त्यामुळे कांबळे कुटुंबियांच्या पाठीमागे एक मोठा आधारवड उभा राहण्याची गरज आहे.