नवी मुंबई / अनंतकुमार गवई़
नवी मुंबई शहर वसविताना येथील स्थानिक प्रकल्पग्रस्तांची 100 टक्के जमीन सिडकोने संपादित केली आहे. परंतु, सिडकोकडून कोणत्याही सुविधा त्याठिकाणी पुरविलेल्या नाहीत. असे असताना नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली गरजेपोटी घरे अनधिकृत ठरविली जाणे अतिशय दुर्दैवी बाब असल्याचे बेलापुरच्या भाजपा आ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची डिसेंबर 2015 पर्यंतची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करणेसंदर्भात शासनस्तरावर आणि विधी मंडळ अधिवेशनात अनेकवेळा पत्रव्यवहार करुन आवाज उठवलेला आहे. तसेच नुकत्याच संपलेल्या अधिवेशनातही सदर विषयासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असता नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची डिसेंबर 2015 पर्यंतची गरजेपोटी बांधलेली घरे आहे त्याच जागेवर कायम करणेबाबतचा मसुदा राज्य शासनाच्या नगरविकास विभागामार्फत तयार करण्यात आला असून तो राज्यपालांकडे मंजुरी करिता पाठविण्यात आला आहे. लवकरच सदरचा विषय मार्गी लागणार असल्याचे दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी सूचित केल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची डिसेंबर 2015 पर्यंतची गरजेपोटी बांधलेली घरे आहेत त्याच जागेवर कायम होणार असल्याचे संकेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचे बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. त्यामुळे आपण यासंदर्भात सततच्या केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून सदरचा विषय मार्गी लागल्याने आपण समाधानी असल्याचे आमदार म्हात्रे यांनी स्पष्ट केले.