नवी मुंबई / साईनाथ भोईर
नवी मुंबई : स्थायी समितीच्या तिजोरीच्या चाव्या राखण्यासाठी तर या चाव्या पुन्हा मिळविण्यासाठी नवी मुंबई महापालिका स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससाठी राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची होवून बसली आहे. काँग्रेस, भाजपा, ुशिवसेनेचे संख्याबळ एकीकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ एकीकडे समसमान असल्याने कदाचित सभापतीपदाचा निर्णय चिठ्ठीवर होण्याची शक्यता आहे. निर्णय चिठ्ठीपर्यत जावू नये म्हणून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छूकांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.
महापालिका सभागृहात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला पाचव्या सभागृहात काठावरचे बहूमत असतानाही राजकीय अस्थिरता निर्माण होवू नये यासाठी उपमहापौरपद आणि एका विषय समितीचे सभापतीपद देवून राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसलाही सत्तेत सहभागी करून घेतले. गेल्या वर्षी स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणूकीअगोदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याने राजीनामा दिल्याने स्थायी समितीमध्ये संख्याबळ 15 राहीले होते. काँग्रेसचे एक व राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 यांची जमाबेरीज पाहता 15 सदस्यांमध्ये 8 मते मिळवून स्थायी समिती सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या आवाक्यात होते. तथापि शिवसेनेचे स्थायी समितीचे उमेदवार शिवराम पाटील यांनी काँग्रेसच्या स्थायी समिती सदस्या मिरा पाटील यांचे मत आपणाकडून वळवित स्थायी समितीवर शिवसेनेचा भगवा फडकविला.
या वर्षी 16 सदस्यांच्या स्थायी समितीमध्ये 8 राष्ट्रवादी काँग्रेसचे, 6 शिवसेनेचे, 1 भाजपाचा व 1 काँग्रेसचा सदस्य आहे. काँग्रेसने मागील वर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेची पाठराखण केल्यास सदस्य संख्या समान होवून सभापतीपदाचा निर्णय चिठ्ठीवर होण्याची शक्यता आहे. परंतु महापौरपदाची निवडणूक अवघ्या 5 महिन्यावर आल्यामुळे स्थायी समितीत शिवसेनेला साथ दिल्यास उपमहापौरपदासह एका विषय समिती सभापतीपदावर काँग्रेसला पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुर्भेतील ज्येष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णींची उमेदवारी निश्चित मानली जात असून शिवसेनेमध्ये मात्र विरोधी पक्षनेते विजय चौगुले आणि नामदेव भगत यांच्यामध्ये उमेदवारीसाठी चुरस असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसच्या स्थायी समिती सदस्या मिरा पाटील या काँग्रेसचे महापालिकेत चार वेळा नगरसेवक राहीलेले माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांचेच म्हणणे अंतिम प्रमाण मानतात. संतोष शेट्टी यांनीच मिरा पाटील यांना निवडून आणल्यामुळे पक्षाच्या व्हीपपेक्षा संतोष शेट्टीचाच शब्द त्यांच्याकरिता अंतिम प्रमाण असल्याचे मागील स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणूकीत पहावयास मिळाला होता. काँग्रेसचे संतोष शेट्टी व शिवसेनेचे विजय चौगुले यांची जीवाभावाची मैत्री जगजाहिर असल्याने विजय चौगुलेंना उमेदवारी मिळाल्यास काँग्रेसच्या मिरा पाटील यांचे मत शिवसेनेलाच मिळण्याची शक्यता महापालिका वर्तुळात चर्चिली जात आहे. तथापि सर्व पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात एकत्रित आले तरी संख्याबळ समसमान राहणार असल्याने चिठ्ठीवरच सभापतीपदाचा निर्णय होण्याची शक्यता अधिक मानली जात आहे.
शिवसेनेच्या एका इच्छूक घटकाने राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक-दोन स्थायी समिती सदस्य सभापतीपदाच्या निवडणूकीला गैरहजर राहतील का, याची चाचपणी सुरू केली आहे. शिवसेना-भाजपातील सध्या सर्वत्र असलेले विळ्या-भोपळ्याचे नाते पाहता भाजपाचा स्थायी समिती सदस्य तटस्थ अथवा गैरहजर राहील का यासाठीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नगरसेवकांकडून पडद्याआडून चाचपणी करण्यात येत आहे. शिवसेनेचे तिकीट कोणालाही मिळाले तरी काँग्रेसच्या मिरा पाटील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसलाच मतदान करतील असा विश्वास काँग्रेसच्या अन्य नगरसेवकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेसने पाठींबा दिला तरी सभापतीपदाचा निर्णय चिठ्ठीवरच जाणार असल्याने राष्ट्रवादीची नाराजी ओढावून उपमहापौेरपद व विषय समिती सभापतीपद गमविण्याचा धोका पत्करण्याची काँग्रेसची तयारी नसल्याचे सध्या पहावयास मिळत आहे. सदस्य गैरहजर राहण्यासाठी सुरू झालेल्या राजकीय हालचाली पाहता स्थायी समिती सभापतीपदाकरता राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाल्याचे नवी मुंबईत पहावयास मिळत आहे.