सुजित शिंदे
मुंबई : हरित महाराष्ट्राचे स्वप्न उराशी बाळगून काम करणारे वने मंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी येत्या तीन वर्षात ५० कोटी वृक्षारोपणाचा संकल्प मनाशी बाळगला आहे. १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत महाराष्ट्रात तब्बल ४ कोटी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या वृक्षारोपणाच्या अपडेटसाठी राज्य सरकारने ‘सॉफ्टवेअर’ बनविले असून या माध्यमातून दररोज कोणत्या ठिकाणी किती वृक्ष लावण्यात आले आहेत व त्या वृक्षाची काय अवस्था याची इंत्यभूत माहिती राज्य सरकार संकलित करणार आहेत.
वने मंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी महाराष्ट्रात सर्वत्र वृक्षसंपदा वाढविण्यासाठी युनोने केलेल्या अभ्यासक्रमाचा आधार घेतला असल्याची माहिती मंत्रालयीन सूत्रांनी दिली. युनोच्या माहितीनुसार भुतानमध्ये दरडोईच्या प्रमाणातही वृक्षसंपदा अधिक आहे. जास्त हिरवीगार वृक्षसंपदेमुळे प्राणवायूही अधिक विकसित होत असल्याने वनेमंत्री मनगुंटीवार यांनी मंत्रिपदाची सूत्रे घेतल्यावर राज्यात वृक्षारोपणावर व वृक्षसंवर्धनावर अधिक भर दिल्याची माहिती मंत्रालयीन सूत्रांनी दिली.
गेल्या वर्षी मनगुंटीवार यांनी २ कोटी वृक्षारोपणाचा संकल्प सोडला होता. तथापि १ जुलै २०१६ या एकाच दिवशी तब्बल २ कोटी ८२ लाख वृक्षारोपण करण्यात आले. याही वर्षी १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत तब्ल ४ कोटी वृक्षारोपण राज्य सरकारच्या माध्यमातून करण्याचा संकल्प वनेमंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी सोडला असून त्यांनी गुरुवार २५ मेपासून आढावा घेण्यासही सुरूवात केली आहे. २५ मे रोजी नागपुरात विभागिय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची मनगुंटीवार यांनी बैठक घेवून वृक्षारोपणाच्या तयारीचा आढावा घेतला आहे. २९ मे रोजी पुण्यात, ३१ मे रोजी कोकणात, १ जुनला नाशिक, २ जुनला अमरावती व औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी व विभागिय आयुक्तांच्या वृक्षारोपण आढावाच्या बैठक घेणार आहेत.
महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात वृक्षारोपणावर भर देण्यात येणार असून वन विभागासह राज्याच्या ३३ प्रशासकीय विभागांनाही वृक्षारोपणाचा अहवाल देण्यात येणार आहे. या वृक्षारोपणात जनतेचा सहभाग असावा यासाठी १० जुनपासून जनजागृती करण्यात येणार असून शाळा व महाविद्यालयातही विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यात येणार आहे. या वृक्षारोपणाबाबत करण्यात आलेल्या ‘सॉफ्टवेअर’चीच मंत्रालयात चर्चा असून या सॉफ्टवेअरमुळे खर्या अर्थांने कोठे कोठे राज्यात वृक्षारोपण झाले आणि वृक्षसंवर्धन त्यापैकी झाले याची राज्य सरकारला पाहिजे तेव्हा अपडेट माहिती मिळणार आहे. वृक्षारोपणामुळे मनगुंटीवार करत असलेल्या परिश्रमाची भाजपा पक्षसंघटनेतही विशेष दखल घेतली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.