आमदार संदीप नाईक यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
नवी मुंबई : प्रतिनिधी
नवी मुंबईतील नागरिकांसाठी विरंगुळयाचे एक दर्जेदार ठिकाण उपलब्ध व्हावे तसेच आणखी एका नाटयगृहाची निर्मिती होवून ऐरोली तसेच आजुबाजूच्या नोडमधील नाटयरसिकांचा वाशी आणि ठाणे येथे नाटके बघण्यासाठी जाण्याचा वेळ व पैसा वाचावा यासाठी आमदार संदीप नाईक यांनी पाठपुरावा करुन या दोन्ही वैशिष्टयपूर्ण प्रकल्पांसाठी सिडकोकडून भूखंड मंजूर करुन पालिकेकडे हस्तांतरण करुन घेतले. विकासनिधी देखील मंजूर करुन घेतला मात्र पालिका प्रशासनाच्या वतीने या दोन्ही प्रकल्पांचे काम धिम्या गतीने सुरु असल्याने आमदार नाईक यांनी शुक्रवारी पालिका मुख्यालयात आयुक्त रामास्वामी एन. यांची भेट घेवून या दोन्ही प्रकल्पांच्या कामांना गती देण्याची मागणी केली.
घणसोलीतील सेंट्रल पार्कच्या कामासाठी आमदार नाईक यांनी सिडकोकडे पाठपुरावा करुन पालिकेला सेक्टर ३ येथे भूखंड उपलब्ध करुन दिला. तसेच राज्य शासनाकडून १० कोटी रुपयांचा विशेष निधी देखील मंजूर करुन घेतला. परंतु या सेंट्रल पार्कचे काम संथगतीने सुरु असल्याचे आमदार नाईक यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. सेंट्रल पार्कच्या भूखंडात सावली गावाचा अंतर्भाव होतो. सावली गावाचे पुनर्वसन ग्रामस्थांना विश्वासात घेवून योग्य प्रकारे प्राधान्याने पूर्ण करावे तसेच या सेंट्रल पार्कचे काम तत्परतेने पूर्ण करावे, अशी मागणी आमदार नाईक यांनी आयुक्त रामास्वामी एन. केली आहे.
नाटयरसिकांची सांस्कृतिक भूक शमविण्यासाठी वाशी येथे एकमेव विष्णुदास भावे नाटयगृह आहे. मात्र ऐरोली आणि परिसरातील इतर नोडच्या नागरिकांना एकतर वाशीतील भावे नाटयगृहात किंवा ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये नाटक पाहण्यासाठी जावे लागते. यामध्ये त्यांचा वेळ आणि पैसा देखील वाया जातो. नाटयप्रेमींची ही अडचण लक्षात घेवून आमदार नाईक यांनी ऐरोलीत नविन नाटयगृहासाठी शासन आणि सिडकोकडे पाठपुरावा करुन पालिकेला सिडकोकडून भूखंड उपलब्ध करुन दिला. या नाटयगृहाचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे यासाठी त्यांनी पालिकेचे तत्कालिन आयुक्त आणि वरिष्ठ अधिकार्यांबरोबर वेळोवेळी बैठका घेतल्या. या नाटयगृहातील काही कामांसाठी आमदार नाईक यांनी स्वतःच्या आमदारनिधीमधून ३० लाख रुपयांचा निधी देखील उपलब्ध करुन दिला आहे. महापालिकेनेही निधीची तरतूद केली आहे. असे असले तरी पाठपुरावा करुन सुरु केलेले हे काम आता थांबले आहे. त्यामुळे ऐरोली नाटयगृहाचे काम लवकरात लवकर पुन्हा सुरु करुन ते ठराविक वेळेत पूर्ण करावे, अशी मागणी आमदार नाईक यांनी आयुक्तांकडे केली. हे नाटयगृह बहुउददेशिय करण्यासाठी वाद्यवादन, संगीत, नाटय प्रशिक्षण, सांस्कृतिक तसेच कलाविषयक शिकवण्या, नाटयस्पर्धा अशा कारणांसाठी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र विभाग राखून ठेवावा, अशा सूचना देखील केल्या. आमदार नाईक यांनी केलेल्या मागणीवर आयुक्त रामास्वामी एन. यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.