सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : ‘एक देश–एक कर’ ही संकल्पना 1 जुलैपासून संपूर्ण देशभरात वस्तू व सेवा कर अर्थात जी.एस.टी. च्या माध्यमातून लागू झाली असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी-कर्मचारीवृंदाने यासाठी खास आयोजित केलेल्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन ही प्रणाली पूर्णत: समजून घ्यावी व देयके बनविताना आणि तपासताना ती अचूक असावीत याची दक्षता घ्यावी असे सांगत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आपल्या महानगरपालिकेच्या करवसूली विभागाने मागील तीन वर्षे अतिशय चांगले काम केल्याने आपल्याला जी.एस.टी. च्या अनुदानाचा पहिल्या हप्त्यात 77.92 कोटी इतकी चांगली, राज्यात चौथ्या क्रमांकाची रक्कम मिळाल्याचे सांगत अभिनंदन केले. करवसूलीचा हाच वेग कायम ठेवत या वर्षातही चालू वसूली तसेच मागील थकबाकीची वसूली अधिक कशी होईल यावर भर देण्याची सूचना त्यांनी केली.
नवी मुंबई महानगरपालिका लेखा विभागाच्या वतीने महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात जी.एस.टी. कर प्रणालीबाबत आयोजित अधिकारी – कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रमाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण व श्री. रमेश चव्हाण, प्रशासन विभागाचे उपआयुक्त डॉ. सुहास शिंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, उपआयुक्त श्री. किरणराज यादव, प्रशिक्षणाचे मार्गदर्शक वक्ते श्री. जिग्नेश चावला व श्री. ऋतुराज इंगळे आणि इतर विभागप्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते.
दोन सत्रात आयोजित केलेल्या या विशेष प्रशिक्षण वर्गातील जी.एस.टी. कर प्रणाली बाबतच्या माहितीचा उपयोग सर्व अधिकारी-कर्मचारी यांना यापुढील काळात लेखाविषयक कामकाजात होईल असा विश्वास व्यक्त करीत मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड यांनी प्रास्ताविकपर मनोगतात जी.एस.टी. करप्रणाली बाबत कोणत्याही प्रकारची शंका मनात राहू नये यादृष्टीने माहितीच्या सत्रानंतर चर्चासत्रामध्ये शंकानिरसन करून घ्यावे असे आवाहन केले. यावेळी विभागप्रमुखांसह महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.