शेतकऱ्यांना मोफत खते, बियाणे व पतपुरवठा करण्याची मागणी
मुंबई : पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणीची भीती निर्माण झाली असून, सरकारने दुबार पेरणीकरिता शेतकऱ्यांना मोफत खते, बियाणे व पतपुरवठ्यासंदर्भात मदत करण्याची तयारी सुरू करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
राज्यातील पेरणीच्या परिस्थितीसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, राज्याच्या कृषिमंत्र्यांनीही 2 दिवसात पाऊस न आल्यास 12 जिल्ह्यात दुबार पेरणीची वेळ ओढवू शकते, यास पुष्टी दिली आहे. परंतु, सरकारने पाऊस येतो की नाही, याची प्रतीक्षा करण्याऐवजी दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते, असे गृहित धरून तातडीने पूर्वतयारी सुरू करण्याची गरज आहे.
काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात मी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांच्या थेट बांधावर खते पोहोचवली होती. कृषि विभागाच्या कार्यालयांमधून मोफत बियाण्यांची व्यवस्था केली होती. त्यानुसार विद्यमान सरकारनेही शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याच्या अनुषंगाने खते व बियाणे पुरवठ्याची तयारी तातडीने सुरू करावी, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
पीक कर्ज वितरणासंदर्भात तूर्तास मिळणारी माहिती समाधानकारक नाही. जुलैच्या मध्यापर्यंत अनेक बॅंकांनी कर्ज वितरणाचे जेमतेम 50 टक्के उद्दिष्ट गाठल्याची माहिती प्रसार माध्यमांकडून येते आहे. याचाच अर्थ अजूनही बहुतांश शेतकऱ्यांना पेरणीच्या तयारीसाठी भांडवल उपलब्ध झालेले नाही, हे स्पष्ट आहे. शेतकरी कर्जमाफीची घोषणा करताना सरकारने पेरणीसाठी 10 हजार रूपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती. परंतु, या योजनेंतर्गत जेमतेम 1 कोटी रूपयांचे वितरण झाल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने गाफील न राहता मोफत खते व बियाण्यांसोबतच शेतकऱ्यांना पतपुरवठा उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने तातडीने पावले उचलावीत, अशीही मागणी विरोधी पक्षऩेत्यांनी केली आहे.