पनवेल : निसर्गाच्या सानिध्यात सर्वानाच राहायला आवडते. सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्या शहरी नागरिकांना डोंगरदऱ्याचे आणि समुद्र किनाऱ्याचे आकर्षण असते. त्यातुनच शहरा लगतच्या पर्यटनस्थळांचा पर्यावरणप्रेमी शोध घेतात. पनवेलपासून अवघ्या २ किलोमीटरवर असलेला आदई धबधबा सध्या पर्यावरणप्रेमींना खुणावतोय. वनविभागाचे याठिकाणी दुर्लक्ष असल्यामुळे पूर्णतः स्वातंत्र्य असलेला हा डोंगराळ भाग आणि त्यात पडणारा धबधबा मनशांती देऊन जातो.
ज्यावेळी रस्ते न्हवते तेंव्हा माणूस डोंगरदऱ्यातूनच पायवाट काढत प्रवास करायचा. त्यामुळे संपूर्ण भौगोलिक परिसराशी त्याची नाळ जुळलेली होती. प्रत्येक ठिकाणचे धोक्याचे इशारे त्याला पटकन कळायचे. कालांतराने रस्ते आले आणि कांही डोंगरांवर माणसांनी जाणेच बंद केले. मात्र अतिउत्साही मनोरंजनवादी पर्यटकांनी हि भटकंती सुरूच ठेवून डोंगरांवर उन्माद करायला सुरवात केली. त्यातूनच अपघात,अनुचित प्रकार आणि निसर्गाची हानी हे सर्व प्रकार पाहायला मिळतात. सध्या नवीन पनवेलला सर्वाधिक जवळचा ”आदई धबधबा” याचीच तर साक्ष देत आहे. या धबधब्याची रचना पांडवकड्याशी मिळतीजुळती आहे.नयना क्षेत्रात येणारा आदई धबधबा हे उत्तम पर्यटनस्थळ होऊ शकते.आदईचा विस्तार पाहता या धबधब्याचे पाणी अडवल्यास या परिसराची पाण्याची समस्या सुद्धा कांहीशी दूर होऊ शकते. सध्या या धबधब्याचा ताबा हौशी पर्यटक घेत असून पार्ट्या झोडणे आणि मनोरंजन करणे हा एककलमी कार्यक्रम येथे सुरु असतो.
आदई धबधब्याच्या पायथ्याशी थेट गाडी न्हेता येते. त्यानंतर थोडा ट्रेक केल्यावर आपण उंचावरून पडणाऱ्या पाण्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो. पाऊस जसा वाढेल तसे येथील पाणी वाढते आणि धोकाही.या धबधब्याच्या पाण्यात कांही ठराविक दिवस छोटे दगडसुद्धा वाहून येतात त्यामुळे थोडी सावधानता बाळगणे आवश्यक ठरते. शेजारील डोंगरावरून आपण धबधब्याच्या मुखाशी जाऊन थ्रिल अनुभवू शकतो मात्र हा थ्रिल अनुभवने कांही पर्यटकांना गेल्यावर्षी महागात पडले आहे. धबधब्याच्या पलीकडे हरिग्राम,केवाळे,मोरबे,वाकडी,महा ळुंगी परिसर आहे.
वृक्षारोपणाची मोठी संधी या परिसरात आहे. शिवाय या परिसराचा सर्वानी माती काढून न्हेण्यासाठीच आणि झाडे तोडून न्हेण्यासाठीच उपयोग केला आहे. आता येथील निसर्गसंपदा जतन करणे आणि वृक्षारोपणाच्या साहाय्याने वाढवणे हि काळाची गरज बनली आहे. येथील मूळ शेतकरी सध्या तोकड्या जागेत ”जित्राप” म्हणजे भाजीपाल्याचा मळा लावतात. सिडकोमध्ये येथील भूमिपुत्र कामाला असल्यामुळे तशी रोजगाराची समस्या नसली तरी पर्यटनस्थळ म्हणून या परिसराकडे वन विभागाने लक्ष द्यावे अशी त्यांची अपेक्षा आहे. सध्यातरी मोकाटपणे तरुणांना येथे संपूर्ण स्वातंत्र्य अनुभवायला मिळत आहे.