भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवारांचे युवकांना मार्गदर्शन
रोजगार मेळाव्यात अनेकांना रोजगाराच्या संधी
कल्याण : प्रतिनिधी
हातात काम नसल्यामुळे खचून जाऊन नका, आयुष्यात आलेल्या छोट्या छोट्या संधीच तुम्हाला सुवर्णकाळाकडे घेऊन जातात. एकनिष्ठ मेहनतीने काम करा, कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. या प्रत्येक टप्यात आलेला मौलिक अनुभव मोठा असतो, हाच अनुभव तुम्हाला यशस्वीतेकडे घेऊन जातो असे विधान भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांनी केले. आमदार नरेंद्र पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून शुक्रवारी कल्याण पश्चिमेतील सर्वोदय गार्डन येथील विनायक हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात त्यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन सदस्य कल्पेश जोशी, युवा मोर्चा प्रदेश सचिव निखील चव्हाण, भाजपा कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, भाजपाचे ठाणे विभागाचे सरचिटणीस राजाभाऊ पातकर, भाजपा कल्याण शहर सरचिटणीस सदानंद कोकणे, भाजपा ज्येष्ठ नेते देवानंद भोईर, उद्योजक प्रसाद कुलकर्णी, गणेश काळण तसेच फ्लिप कार्ड आणि प्रणव असोसिएटच्या अंजली सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येकाच्या हाताला काम, प्रत्येक गरजवंताला रोजगार यामाध्यमातून भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांच्या जनसंपर्क कार्यालया मार्फत गेल्या अडीच वर्षांपासून शैक्षणिक पात्रतेनुसार अनेक गरजू बेरोजगार युवक – युवतीना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम सुरु आहे. तसेच केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी मुद्रा योजनेच्या माध्यमातून लघु उद्योजकांना अल्प व्याजदरात शासनाच्या निकषांनुसार भांडवली कर्ज मिळवून देऊन रोजगारांच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी आमदार नरेंद्र पवार यांच्या कार्यालयातून मोठ्या प्रमाणावर काम सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून टप्या टप्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन देखील केले जात आहे. शुक्रवारी कल्याण पश्चिमेतील सर्वोदय गार्डन येथील विनायक हॉल येथे फ्लिप कार्ड आणि प्रणव असोसिएटच्या सहकार्याने १० व १२ वीत उत्तीर्णी झालेल्या युवकांना रोजगार मिळावा या हेतूने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात उपस्थित असलेल्या युवक आणि युवतीना वेगवेळ्या पदांसाठी फ्लिप कार्ड, अमेझॉन आणि लाइव वेअर या कंपन्यामध्ये जॉब ऑफर करण्यात आले. या रोजगार मेळाव्याने हाताला काम मिळाल्यामुळे उपस्थित युवक व युवतींनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान यावेळी उपस्थित युवक आणि युवतींशी संवाद साधताना आमदार नरेंद्र पवार यांनी कोणते हि काम छोटे नसते, प्रत्येक कामात मेहनतीच्या बळावर आपले स्थान बळकट करा, आयुष्यात पुढे जाल असा मौलिक सल्ला दिला. मतदार संघातील प्रत्येक तरुणाला रोजगार मिळावून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असून बेरोजगार युवक – युवतींनी हाताश न होता आमदार जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.