पनवेल : दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांना राज्य शासनाने ‘मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ द्यावा, याकरीता येणार्या सभेत ठराव घेवून राज्य शासनाला शिफारस करण्याची संघर्ष समितीची विनंती चर्चेला घेवू, अशी ग्वाही नवनिर्वाचित महापौर डॉ. कविता चौतमल यांनी दिली.
आज, शुक्रवारी (दि. 14) सकाळी महापौर डॉ. कविता चौतमल यांची महापालिकेत संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यावेळी महापौरांनी संवाद साधला.
पनवेल नगरीने दिबांना घडवले आहे. याच नगरीचे ते नगराध्यक्ष होते. आमदार, खासदार होते. त्यांना राज्य शासनाचा मानाचा, मरणोत्तर का होईना, परंतू, महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा यासाठी संघर्ष समितीने राज्य शासनाला साकडे घातले आहे. पनवेल, उरण तालुक्यातील ग्रामपंचायती, जिल्ह्यातील आमदार, खासदार, मंत्री महोदयांना पत्र पाठवून त्यांच्याकडून राज्य शासनाला शिफारस पत्र मागण्यात आले असल्याची माहिती डॉ. चौतमल यांना देण्यात आली.
महापालिकेने यासंदर्भात निर्णय घेवून शिफारस पत्र द्यावे, दिबांच्या नावाने सामाजिक स्तरावर काम करणार्या व्यक्तीला पुरस्कार द्यावा, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती घोषित करावी, महापालिका क्षेत्रात दिबांचा पुतळा उभारण्यात यावा आदी महत्वपूर्ण मागण्यांसह विशेष अधिकार वापरून महापौरांनी सभा बोलावून विशेष समिती सभापती, प्रभाग समिती रचना, अध्यक्ष निवड आणि त्या प्रभाग समितीवर एनजीओची नियुक्ती करताना सामाजिक, वैद्यकीय, क्रीडा, न्याय प्रक्रिया क्षेत्रातील मान्यवरांची, थोडक्यात बिगर राजकीय व्यक्तींची नियुक्ती करावी, अशी मागणी केली. या सर्व मागण्यांची महापौर डॉ. चौतमल यांनी दखल घेतली.
या चर्चेत नगरसेवक तथा आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, विजय काळे, माधुरी गोसावी, कांतीलाल कडू आदींनी सहभाग घेतला.
शिष्टमंडळात दमयंती म्हात्रे, उज्वल पाटील, पराग बालड, कविता ठाकूर, भारती जळगावकर, मंगल भारवाड, रमेश फुलोरे आदींचा समावेश होता