नवी दिल्ली : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथे राष्ट्रीय स्मारक उभारावे,अशी मागणी जलसंधारण आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालक मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री महेश शर्मा यांना केल्याची माहिती महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
येथील शास्त्री भवनात आयोजित बैठकीत श्री शिंदे यांनी केंद्रीय मंत्री श्री शर्मा यांची भेट घेवून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी राष्ट्रीय स्मारकाबाबतचे निवेदन सादर दिले. इ.स. 1725 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यामधील चौंडी या गावात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म झाला होता. वयाच्या 8 व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. त्यांचे माहेरचे आडनाव शिंदे असून लग्नानंतर त्या होळकर झाल्या. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी आपल्या संपूर्ण कारर्किदीत अनेक ठिकाणी मंदिरे, घाट बांधले,लोककल्याण कार्यात आपले आयुष्य व्यतीत केले. नगर जिल्ह्यातही त्यांनी अनेक ठिकाणी घाट बांधलेले आहेत. त्यांचे वास्तव्य असलेले घर आजही चौंडी येथे आहे. हे ठिकाण राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित व्हावे, अशी मागणी अनेक वर्षापासून करण्यात येत आहे. याबाबत राज्य शासनाकडून तसेच भारतीय पुरात्तत्व विभागाकडून अहवाल मागवून या स्मारकाबाबत विचार केला जाईल, असे आश्वासन श्री शर्मा यांनी दिले, असल्याचे श्री शिंदे म्हणाले.
***
राज्यातील तलावांच्या दुरूस्ती, नुतनीकरणासाठी केंद्र सहकार्य करणार : प्रा. शिंदे
राज्यातील पाझर तलाव, साठवण तलावांचे नुतनीकरण, दुरूस्ती, सुधारांसाठी आवश्यक निधी केंद्राकडून मिळणार असल्याची, माहिती राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज दिली.
आज श्री शिंदे यांनी केंद्रीय जलसंधारण मंत्री उमा भारती यांची श्रम शक्ती भवन येथे भेट घेतली. श्री शिंदे म्हणाले, राज्यातील सात विभागात 2877 जूने पाझर, साठवण तलाव आहेत या तलांवाची डागडूजी होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी अंदाजित 275 कोटींचा निधी आवश्यक आहे. यातंर्गत तलावांमधला गाळ काढणे, तलांवाचे नुतनीकरण, दुरूस्त्या आदी करण्यात येईल, जेणे करून या तलावांचा पुनर्वापर करता येईल. याबाबतचा विस्तारीत प्रकल्प अहवाल पाठविण्यात येईल, केंद्रीय मंत्री उमा भारतींशी या विषयांवरील बैठक सकरात्मक झाली असून त्यांनी या प्रकल्पासाठी आर्थिक सहायतेचे आश्वासन दिले, असल्याचे श्री शिंदे यांनी सांगितले.