सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : जगात सर्वात लोकप्रिय असणा-या व सर्वाधिक देशात खेळल्या जाणा-या फुटबॉल खेळातील सर्वात मानाच्या फिफा वर्ल्ड कप मध्ये सतरा वर्षाखालील ‘अंडर 17 वर्ल्ड कप इंडिया 2017’ ऑक्टोबर महिन्यात नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये खेळविला जात असून त्याच्या सरावासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे नेरूळ, से.19 येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगण विशेष मैदान म्हणून तयार केले जात आहे.
ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील लोकप्रिय स्पर्धा नवी मुंबईत आयोजित केली जात असताना देशभरातूनच नव्हे तर जगभरातून हे सामने बघण्यासाठी येणा-या फुटबॉलप्रेमींचे स्वागत करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली असून आज महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी याबाबतच्या पूर्वतयारीचा विस्तृत आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण यांचेसह शहर अभियंता श्री. मोहन डगांवकर तसेच संबंधित विभागप्रमुख त्याचप्रमाणे डी.वाय.पाटील स्टेडियम, वाहतुक पोलीस विभाग, नवी मुंबई स्पोर्टस् असो., एम.जी.एम. रूग्णालय वाशी यांचे उच्च अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आयुक्तांनी स्पर्धेतील सामन्यांच्या सरावाच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण क्रीडांगणाच्या फुटबॉल मैदान स्वरूपातील कामाच्या तयारीचा आढावा घेतला. यापूर्वी आयुक्तांनी 24 मे 2017 रोजी या मैदानाला प्रत्यक्ष भेट देऊन मौलिक सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने त्यांनी मैदानाच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. अशाच प्रकारे सराव वाशी येथील एन.एम.एस.ए. मैदान तसेच डी.वाय.पाटील विद्यापीठ मैदान याठिकाणी होणार असून त्याचीही माहिती आयुक्तांनी घेतली व महानगरपालिकेकडून स्पर्धेच्या कामाकरिता सर्वोतोपरी सहकार्य राहील असे सांगितले.
सराव मैदानांच्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण क्रीडांगणाच्या ठिकाणी नेरूळ अग्निशमन केंद्रामार्फत, एन.एम.एस.ए. वाशी मैदानाच्या ठिकाणी अग्निशमन केंद्र वाशी यांचेमार्फत तसेच डी.वाय.पाटील स्टेडियम नेरूळ येथे बेलापूर अग्निशमन केंद्रामार्फत अग्निशमन वाहने व अग्निशमन जवान तैनात असतील असे आयुक्तांनी सांगितले. त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण क्रीडांगणाच्या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत, एन.एम.एस.ए. वाशी मैदानाच्या ठिकाणी एम.जी.एम.रूग्णालय वाशी यांचेमार्फत तसेच डी.वाय.पाटील स्टेडियम नेरूळ येथे डी.वाय.पाटील रूग्णालयामार्फत रूग्णवाहिका व वैद्यकीय पथक कार्यरत ठेवावे असे आयुक्तांनी सूचित केले.
नवी मुंबईमध्ये या स्पर्धेच्या निमित्ताने देशा-परदेशातील फुटबॉलपटू व फुटबॉल रसिक येणार असून त्या अनुषंगाने त्यांचे स्वागत करण्यासाठी नवी मुंबई शहर सज्ज असून ‘यजमान शहर (Host City)’ म्हणून शहरातील प्रवेशाची ठिकाणे, मुख्य चौक, वाहतुक बेटांचे सुशोभिकरण करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित विभागांना दिले. आपल्या नवी मुंबई शहरामध्ये जागतिक दर्जाची फुटबॉल स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात होत असून समस्त नवी मुंबईकर नागरिक, त्यातही विशेषत्वाने तरूणाई याकरिता उत्सुक असून नवी मुंबई महानगरपालिकाही यादृष्टीने आवश्यक तयारी करत असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सांगितले.