पनवेल : शहर नोडमध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दारूबंदी कायम रहावी, यासाठी शाश्वत फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा खारघर शहर महिला सरचिटणीस बिना गोगरी यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे लेखी निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली आहे.
खारघर शहराची ओळख १००टक्के दारूबंदीचे शहर अशी आहे. मात्र, तारांकित रॉयल ट्युलिप हॉटेलने आघाडी सरकारच्या काळात राज्य शासनाकडून हॉटेलमध्ये दारूविक्रीचा परवाना मिळवून दारूमुक्त खारघरला तिलांजली दिली होती. मात्र, काही महिन्यांपूर्वीच उच्च न्यायालयाने देशात लागू केलेल्या राज्य व राष्ट्रीय महामार्गपासून ५०० मीटरच्या दारूविक्रीवर बंदी आली आणि, खारघर नोडमधील रॉयल ट्युलिप व नोडलगतच्या कोपरी गावातील अजित पॅलेस अश्या दोन्ही बार/हॉटेलमधील दारूविक्रीला पूर्णविराम मिळाला.
मात्र, आता काही दिवसांपूर्वीच वर नमूद दोन्ही बार/हॉटेल यांना दारूविक्रीचा परवाना प्राप्त झाला आहे. त्यामुळे, भविष्यात खारघर शहरात अधिक मोठ्याप्रमाणात दारूविक्रीला परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्यामुळे, खारघर मधील सामाजिक व सांस्कृतिक सुरक्षतेला बाधा निर्माण होऊ शकतो. असे मत स्थानिक नागरिकांचे आहे.
त्यामुळे, आताच्या दारूविक्री प्राप्त परवानगीमुळे भविष्यात खारघर शहराची शांतता भंग होत येथे सुरक्षा-व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून, बिना गोगरी यांनी खारघर शहरात दारूबंदी कायम राहावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे केली आहे.