मुंबई, दि. 17 : विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज विभागाचा आढावा घेतला. विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेच्या समित्यांच्या नियुक्ती करण्यासाठी तसेच अध्यक्ष नेमणुकीसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रा. शिंदे यांनी यावेळी दिले.
सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत प्रा. शिंदे यांनी विभागाची संरचना, पदांची स्थिती तसेच राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती घेतली. यावेळी राज्यमंत्री मदन येरावार, सचिव दिनेश वाघमारे, सहसंचालक भा.रा. गावित, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण संचालनालयाचे संचालक श्री. अहिरे आदी यावेळी उपस्थित होते.
विविध योजनांचा आढावा घेऊन प्रा. राम शिंदे यांनी या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सूचना संबंधितांना केल्या. ते म्हणाले, वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी वस्ती/तांड्यांची यादी करण्यासाठी आराखडा तयार करावा. तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना अधिक लोकाभिमुख करण्यासाठी फेर आराखडा सादर करण्यात यावे. तसेच वाहन चालक प्रशिक्षण योजना ही जिल्हास्तरावरून राबविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावे.
राज्यातील विविध बोर्डामध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या स्व. वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार लवकरात लवकर देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.
श्री. येरावार यांनीही विविध योजनांसंदर्भात सूचना केल्या.
वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक महामंडळाचे अध्यक्ष तथा विभागाचे मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहात झाली. महामंडळामार्फत वितरित करण्यात येणाऱ्या कर्जाची तसेच त्याच्या वसुलीची अद्ययावत माहिती पावसाळी अधिवेशनापूर्वी सादर करण्याचे निर्देश प्रा. शिंदे यांनी यावेळी दिले.