अलिबाग/प्रतिनिधी
खारघर येथील वादग्रस्त रॉयल ट्युलिपचे काही शरण बारची परवानगी रद्द करा व सर्वोच्च न्यायालय व लोकभावनेचा आदर करण्यासाठी पनवेल संघर्ष समितीने जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर व राज्य उत्पादन शुल्क रायगड अधीक्षक सीमा झावरे यांना पनवेलसारखी परिस्थिती खारघरची होऊ नये, यासाठी निवेदन दिले असल्याची माहिती तुषार विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी दिली.
यावेळी ज्येष्ठ सदस्या माधुरी गोसावी, दमयंती म्हात्रे, उज्वल पाटील, पराग बालड, भारती जळगावकार, जसविंदरसिंग सैनी, संतोष पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर व राज्य उत्पादन शुल्क रायगड अधीक्षक सीमा झावरे यांनी सदर बारवर माहिती घेऊन कारवाई करणार असल्याचे पनवेल संघर्ष समितीला सांगितले.
खारघर शहर हे विद्येचे माहेरघर बनावे, दारूचे अड्डे बनू नये यासाठी येथील महिलांनी यापूर्वी मोठे आंदोलन केले होते. या महिलांच्या आंदोलनाला मोठे यशही प्राप्त झाले होते. सरकारी कागदोपत्री बंदी नसताना खारघर शहर हे महिलांनी ‘दारू मुक्त शहर’ बनविले होते. त्यामुळे शहराचे सामाजिक स्वास्थ टिकून राहिले.
खारघर शहर हे सांस्कृतिक शहर असून पुण्यासारखे ते विद्येचे माहेरघर बनत आहे. अनेक सुसज्ज अशी शिक्षण संस्था येथे असून मुंबई, ठाणे परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी खारघरमध्ये येत असतात, अशी माहिती पत्रकार परिषदेत कांतीलाल कडू यांनी दिली.
खारघर विद्येचे माहेरघर बनावे अशी महिलांची इच्छा असताना जिल्हाधिकारी कार्यालय, उत्पादन शुल्क खाते व बांधकाम खात्याच्या कार्यालयाने खारघर येथील वाधवा नावाच्या बांधकाम व्यवसायिकाशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करून दारू विक्री परवाना दिला. त्यामुळे महिलांनी पुढाकार घेऊन दारुमुक्त शहर करण्याचा प्रयत्न केला असताना शासन मात्र दुट्टपी भूमिका बजावत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य मार्गापासून 500 मीटर अंतरावरचे सर्व परमिट रम व बार, वाईन शॉपवरची विक्री बंद करण्यात आले असताना सार्वजनिक बांधकाम विभाग चेंबूर यांनी दिलेल्या अहवालानुसार रॉयल ट्युलिपचे काही शरण बारला दिलेली परवानगी चुकीची असल्याचा आरोप संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी पत्रकार परिषदेत केला.
रॉयल ट्युलिपचे काही शरण बारला दिलेली परवानगी ही चुकीची असून परवानगी दिलेल्या अधिकार्यावर चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी पनवेल संघर्ष समितीने केली आहे.
खारघर शेजारी असणार्या पनवेल शहराचे आज डान्स बार व परमिट बारमुळे सामाजिक स्वास्थ बिघडत चालले आहे. अशी परिस्थिती खारघरची होऊ नये, यासाठी सर्वपक्षीय, सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
खारघर हे विद्येचे माहेरघर व्हावे ही खारघरवासियांची मागणी असून येथील बार संस्कृती वाढू न देता तिला आधीच ठेचले पाहिजे. यासाठी खारघरमध्ये सह्यांची मोहीम हाती घेणार असल्याचे कांतीलाल कडू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचबरोबर खारघरवासियांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहनही ‘पनवेल संघर्ष समिती’ने केले आहे.