* गव्हाण, रांजणपाडा, न्हावा-शेवा, डोंगरी आणि उरण या पाच स्थानकांची कामे भूसंपादन आणि इतर कारणांमुळे रखडली
* रेल्वे प्रकल्पाचा खर्च 1800 कोटीच्या घरात पोहोचला
* या रेल्वे मार्गाच्या प्रत्यक्ष कामास जुन 2012 ला सुरूवात झाली
नवी मुंबई : नेरुळ-उरण रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील कामाने वेग घेतला आहे. येत्या डिसेंबर अखेरपर्यंत या मार्गावर खारकोपरपर्यंत प्रत्यक्ष लोकलसेवा सुरु करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत. त्यानुसार सदर मार्गाची नुकतीच चाचपणी देखील करण्यात आल्याने आगामी सहा महिन्यात जानेवारी 2018 मध्ये सदर मार्ग प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी सिडको आणि रेल्वे प्रशासन प्रयत्नशिल आहे.
मानखुर्द-पनवेल आणि ठाणे-पनवेएल या दोन रेल्वे प्रकल्पांमुळे नवी मुंबईच्या विकासाला चालना मिळाली आहे. या प्रकल्पात सिडकोचे मोठे योगदान राहिले असून सदर दोन मोठ्या प्रकल्पांपाठोपाठ सिडकोने जुलै 1997 मध्ये नेरुळ उरण या 27 कि.मी. लांबीच्या रेल्वेमार्गाचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु, विविध कारणांमुळे सदर प्रकल्प रखडला होता. मात्र, यानंतरही सिडको प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पाला यश आले. यानंतर जून 2012 पासून सदर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली असून आता तो प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे.
सिडको आणि रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणार्या नेरुळ उरण रेल्वेमार्गावर 10 स्थानके आहेत. या प्रकल्पाचा खर्च आता 1800 कोटींपर्यंत गेला आहे. सदर संपूर्ण मार्गावर चार उड्डाणपुल बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी उलवे खाडीवरील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाचे काम याअगोदरच पूर्ण करण्यात आलेले आहे. तर या मार्गावरील पाचव्या खारकोपर स्थानकाचे काम देखील पूर्णत्वास आलेले आहे. याशिवाय या मार्गावर 15 ठिकाणी भुयारी मार्ग आणि 78 छोट्या नाल्यांचा समावेश आहे. दुसरीकडे नेरुळ-उरण रेल्वेमार्गाच्या शेवटच्या टप्प्यातील काही कामे प्रगतीपथावर असून काही कामे विविध कारणांमुळे संथगतीने सुरु आहेत. परंतु, सदर कामे देखील आगामी पाच-सहा महिन्यात पूर्ण करुन नवीन वर्षाच्या सुरुवातीस जानेवारी 2018 मध्ये नेरुळ ते खारकोपरपर्यंत लोकलसेवा सुरु करण्याचा रेल्वे आणि सिडको प्रशासनाचा मानस आहे. त्याअनुषंगाने नुकतीच रेल्वे प्रशासनाकडून खारकोपर पर्यंतच्या मार्गाची चाचपणी करण्यात आली.
दरम्यान, नेरुळ-उरण रेल्वेमार्गावरील पहिल्या टप्प्यातील सीवुडस्, सागरसंगम, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर या पाच स्थानकांची कामे पूर्ण झाली आहेत. तर शेवटच्या टप्प्यातील गव्हाण, रांजणपाडा, न्हावा-शेवा, डोंगरी आणि उरण या पाच स्थानकांची कामे भूसंपादन आणि इतर कारणांमुळे रखडली आहेत.