दिपक देशमुख
नवी मुंबई : दिघा,संजय गांधी नगर येथील रेल्वे ट्रॅक लगत गटारावर अनधिकृतपणे बालवाडी बांधण्यात आली. याबाबत भाजपच्या पदाधिकार्यांनी मनपाला अनेक पत्र दिली. परंतु स्थानिक नगरसेविकेच्या माध्यमाने हे काम होत असल्याने त्यावर मनपाने कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या कार्याशीलतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विशेष म्हणजे या बालवाडीला स्थानिक नगरसेविकेच्या सासूबाईंचे नाव दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे बालवाडीचा प्रश्नावरून स्थानिक भागात भाजप विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस असे राजकीत पडघम वाजण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
दिघा संजय गांधी नगर, देवराम नगर प्रभाग क्रमांक 9 च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका अपर्णा गवते आहेत. नगरसेविका गवते यांच्या माध्यमाने या परिसरात एका मोकळ्या भूखंडावर अनधिकृत बालवाडी बांधण्यात आली. महत्वाचे म्हणजे ही बालवाडी मनपाची आहे. बांधण्यात आलेल्या बालवाडीला 52 हा क्रमांकही देण्यात आला आहे. परंतु ही बांधण्यात आलेली बालवाडी बांधण्यामागे स्थानिक नगरसेविका असल्याने त्यांच्या हट्टापायी नियम धाब्यावर बसून ही बांधण्यात आल्याचे सांगत सुरुवातीपासूनच भाजपच्या युवा मोर्चाचे सरचिटणीस हरीश पाण्डेय यांनी अतिक्रमण विभागाला गेल्या तीन महिन्यापासून पत्रव्यवहार केले आहेत.
ज्या ठिकाणी बालवाडीचे बांधकाम झाले आहे. ते एका गटारावर झाले आहे. रेव्ह ट्रॅक जवळच असल्यामुळे बालवाडीत शिक्षण घेणार्या मुलांना याचा जास्त धोका असल्याने येथे अनधिकृत बांधकाम करून बालवाडी सुरु करू नये, अशा प्रकारचे पत्र मनपा आयुक्त, अतिक्रमण उपायुक्त, स्थानिक विभाग अधिकार्यांना दिले होते. परंतु मनपा अधिकारी स्थानिक नगरसेविकेला नमले असल्याचा आरोप हरीश पाण्डेय यांनी केला आहे.
या संदर्भात मनपाच्या अधिकार्यांशी अनेकदा संपर्क साधल्यावर ती जागा रेल्वे प्रशासनाची आहे असे सांगून आमची बोळवण केल्याचे पाण्डेय यांनी सांगितले. इतर वेळेला सिडको,एम.आय.डी.सी व पर्यावरणाच्या जागेवर मनपा कारवाई करते परंतु इथेच दुजाभाव का असा सवालही पाण्डेय यांनी केला आहे.
मनपाने यावर कारवाई केली नाहीतर आम्ही आमचे कार्यकर्ते येथे उतरून साम,दाम,दंड,भेदचा वापर करून मुलांच्या जीवित रक्षणासाठी बालवाडी बंद करू असे पाण्डेय यांनी सांगितले. त्यामुळे बालवाडी प्रश्न भविष्यात पेटणार असल्याचे दिसत आहे.
या बाबत नगरसेविका अपर्णा गवते यांच्याशी संपर्क साधला असता,त्यांनी मोबाईल घेतला नाही, परंतु नगरसेवक नवीन गवते यांनी सांगितले कि,ती बालवाडी मनपाची आहे, दुसरे म्हणजे दिघ्यामध्ये अधिकृत काय आहे असा उलटा प्रश्नही त्यांनी केला.
या बाबत मनपाचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, अतिक्रमण विभागाला पाहणी करून कारवाईचे आदेश देतो असे सांगितले.
याबाबत दिघा परिसरात बालवाडी प्रकरणावरून भाजपा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस असे वातावरण चिघळण्याची शक्यता असून रेल्वेच्या जागेवर महापालिकेने बांधकाम केल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्याकडून याची लवकरच दखल घेतली जाणार असल्याची भाजपा कार्यकर्त्यात चर्चा सुरू आहे.