मनसेची तक्रार… तंत्र शिक्षण संचालनालयाचे चौकशीचे आदेश
व्यवस्थापन कोट्याचे प्रवेश नियम डावलून
नवी मुंबई : माजी शिक्षण मंत्री जावेद खान यांच्या ओरिएंटल एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या मालकीचे असलेले नवी मुंबईतील फार्मसी व एमबीए महाविद्यालय व जोगेश्वरी येथील फार्मसी व मॅनेजमेंट महाविद्यालयांमध्ये चालू वर्षीच्या (२०१७-१८) मॅनेजमेंट कोट्यातील (व्यवस्थापन कोटा) प्रवेश हे मोठ्या प्रमाणात डोनेशन घेऊन केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. सदर गोष्टीची तक्रार मनसेने आज श्री.चंद्रशेखर ओक, संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली आहे. दरम्यान ओरिएंटल एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या नवी मुंबई व जोगेश्वरी येथील दोन्ही महाविद्यालयांमध्ये झालेल्या मॅनेजमेंट कोट्यातील (व्यवस्थापन कोटा) प्रवेशांची तपासणी करण्यासाठी तात्काळ चौकशी समिती नेमण्याची मागणी आज मनसेने केल्याचे नवी मुंबई मनसे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
टी.एम.पै. फाउंडेशनच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आधार घेत तंत्र शिक्षण संचालनालयाने दिलेल्या नियमानुसार इंजिनीअरिंग, एमबीए, औषध निर्माण शास्त्र, वास्तुविशारद शास्त्रच्या व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशाला घालून दिलेल्या मार्गदर्शक नियमानुसार या कोट्यातील प्रवेश प्रक्रिया ही संपूर्ण पारदर्शी व मेरीटनुसार व नफेखोरी न करता व्हावी असे म्हटले आहे. तसेच व्यवस्थापन कोट्याच्या जागांसंदर्भात किमान दोन वर्तमानपत्रात जाहिरात देऊन या वर्तमान पत्रांचा उल्लेख ही आपल्या संस्थेच्या माहिती पत्रकात करावा असेही म्हटले आहे. तसेच या जागांची माहिती आपल्या महाविद्यालयाच्या सुचना फलकावर लावून या कोट्यातील जागेच्या संदर्भातील संपूर्ण प्रवेशाचा तपशील (अर्ज विक्री, अर्ज स्वीकारणे, मेरीट लिस्ट लावणे, प्रवेश देणे इत्यादी) लावावा असे नियमात आहे. मात्र ओरिएंटल एज्युकेशन सोसायटीच्या नवी मुंबईतील व जोगेश्वरी येथील फार्मसी व मॅनेजमेंट महाविद्यालयांनी सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाला बगल देत आपल्या महाविद्यालयातील मॅनेजमेंट कोट्यातील (व्यवस्थापन कोटा) प्रवेश मोठ्या प्रमाणात डोनेशन व देणग्या स्वीकारून केल्याचे नवी मुंबई मनसे विद्यार्थी सेनेचे उपशहर अध्यक्ष संदेश डोंगरे व सनप्रीत तुर्मेकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
दरम्यान सदर बाब गंभीर स्वरुपाची असल्याचे मान्य करत लवकरच सदर महाविद्यालयांमध्ये झालेल्या प्रवेशांबाबत चौकशी समिती नेमू असे आश्वासन श्री.चंद्रशेखर ओक, संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई यांनी मनसेच्या शिष्टमंडळास दिले.
आज संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय यांच्या सोबत झालेल्या बैठकीत नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले, नवी मुंबई मनसे विद्यार्थी सेना उपशहर अध्यक्ष संदेश डोंगरे, सनप्रीत तुर्मेकर व मनसैनिक उपस्थित होते.