दिपक देशमुख
नवी मुंबई : नवी महानगर पालिकेच्या घनकचरा विभागात एक तपाहून अधिक काळ दोन उप स्वच्छता निरीक्षकांनी सेवा दिली. परंतु त्यांना आताही ठोक पगारावर काम करावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये कमालीचे नैराश्य पसरले आहे. दरम्यान,त्यांच्याच जोडीला आणखी सहा जणांची भरती केली,त्यांना मात्र प्रशासन विभागाने कायम केले आहे.
मनपा प्रशासनाने 2002 मध्ये म्हणजे 15 वर्षापूर्वी तत्कालीन आयुक्त सुनिल सोनी असताना लेखी व तोंडी परीक्षा घेऊन सरळ सेवा भर्तीने आठ जणांना करार पद्धतीवर उप स्वच्छता निरीक्षक म्हणून कामावर घेतले. तेव्हा त्यांना तीन हजार रुपये इतका पगार देण्यात येत होता. त्यानंतर सहा महिन्यांनी मनपाच्या आस्थापनेवर सुद्धा घेतले. 2007 मध्ये पुन्हा तोंडी व लेखी परीक्षा घेऊन मूळ वेतन देण्यास सुरुवात केली. काही दिवसानंतर आठ पैकी सहा स्वच्छता निरीक्षकांना कायम केले. तथापि विजय काळे व राजेश पारकर यांना मात्र कंत्राटी पद्धतीवरच ठेवण्यात आले. ही सर्व घटना तत्कालीन प्रशासन उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांच्या कालावधीत घडली आहे.
मनपाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे आल्यानंतर त्यांनी या उप स्वछता निरीक्षकांचा मूळ वेतन रद्द करून ठोक पगरावरच बोळवण केली. धडाडीचे आयुक्त म्हणून ख्याती असलेले मुंढे हे आपली दुःखे जाणून आपल्याला कायम करतील अशी अटकळ हे दोन्हीही उपस्वच्छता निरीक्षक करत असताना त्यांनी त्यावर कहर करून ठोक पगारावर ठेवल्याने त्यांच्या मनात कमालीची नाराजी पसरली आहे.
सध्या काळे व पारकर यांना ठोक पगार म्हणून बारा हजार रुपये इतके वेतन मिळत आहे. तर त्यांच्या जोडीला नियुक्त झालेल्यांना 28 हजाराच्या आसपास पगार मिळत आहे. या दोघांना अवघा 12 हजार रुपये पगार मिळत असल्याने आपला संसार कसा हाकायचा असा यक्ष प्रश्न पडला आहे. या वर प्रशासन विभागाने दया दाखवून आम्हाला कायम करावे जेणे करून आमचा घर चांगला चालेल व मुलांचे शिक्षण दर्जेदार देता येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
या बाबत महापालिका अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांना विचारले असता, त्यांनी, हा विषय पंधरा वर्षापूर्वीचा असून त्यावर लगेच भाष्य करणे योग्य होणार नाही. त्याचा अभ्यास करून पुढे काही करता येईल असे सांगितले.