नवी मुंबई : महापालिका प्रशासनाकडून काही दिवसापूर्वीच नेरूळ पश्चिम भागात रिंगरूट बससेवा सुरू करण्यात आली आहे. ही रिंगरूट बससेवेचा मार्ग बदलून हीच बससेवा सानपाडा रेल्वे स्थानक ते सीवूड्सपर्यत करण्याची लेखी मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे रोजगार व स्वंयरोजगार विभागाचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या परिवहन उपक्रमाने नेरूळ पश्चिम परिसरात रिंगरूट बससेवा सुरू केली, त्याबद्दल अभिनंदन करताना रवींद्र सावंत आपल्या निवेदनात पुढे म्हणाले की, या बससेवेचा मोजक्याच लोकांना फायदा होत असून परिवहन उपक्रमाला ही बससेवा आर्थिकदृष्ट्या फायदेशीरही ठरत नाही. त्यामुळे भविष्यात अपुर्या प्रवासी सेवेचे कारण पुढे करून परिवहन उपक्रम ही बससेवा बंद करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याऐवजी या बससेवेचा मार्ग सानपाडा रेल्वे स्थानक ते जुईनगरचे डी-मार्ट, जुईनगर रेल्वे स्थानक व त्यानंतर पुढे नेरूळ पश्चिमचा आहे तोच रिंगरूट मार्ग करत ही बससेवा सीवूडस रेल्वे स्थानकापर्यत घेवून गेल्यास या बससेवेचा खर्या अर्थांने सानपाडा, जुईनगर, नेरूळ आणि सीवूड्स या चारही भागातील लोकांना फायदा होईल. तसेच परिवहन उपक्रमालाही या प्रवासी सेवेचे उत्पन्न प्राप्त होईल. शनिवार, रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी हीच बससेवा सीवूड्स रेल्वे स्थानकापासून पुढे सीवूडस सुधाकरराव नाईक उड्डाणपुलावर वंडर्स पार्क या ठिकाणापर्यत वाढविण्यात यावी की जेणेकरून सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सीवूड्स परिसरातील मुलांना व त्यांच्या पालकांना वंडर्स पार्क या ठिकाणी जाणे उपयुक्त ठरेल असे रवींद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
आपण या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करावा. हा मार्ग सर्व रहीवाशांना सोयीचा व उपक्रमासही फायदेर्शीर ठरेल. जुईनगर, सानपाडा, सीवूडसच्या रहीवाशांना नेरूळ पश्चिम भागात पाहिजे त्या ठिकाणी सोयिस्कर ठरेल. आपण या मार्गाची पाहणी करून लवकरात लवकर या बससेवेच्या मार्गात बदल करून तशी जनजागृतीही करण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.