नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून वाशी सेक्टर 17 मध्ये वाशी बसडेपो, एमटीएनएल कार्यालय यादरम्यान शिवाजी चौकामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा काही वर्षापूर्वी बसविण्यात आला आहे. तथापि तमाम हिंदूंचे प्रेरणास्थान व महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची महापालिका प्रशासनाकडून गांभीर्यपूर्वक देखभाल केली जात नसल्याची नाराजी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून बुधवारी युवा सेनेचे बेलापुर विधानसभा उप विधानसभा युवा अधिकारी निखिल रतन मांडवे यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्री नसल्याने कावळे-कबुतरे पुतळ्यावर विष्ठा टाकून पुतळा खराब करत असतात. महापालिका प्रशासनाकडून शिवछत्रपतींच्या पुतळ्याला कधीही स्नान घातले जात नाही. यामुळे कबुतरे व कावळे यांच्यापासून शिवछत्रपतींचा पुतळा खराब होवू नये म्हणून महाराजांच्या डोक्यावर छत्री बसविणे आवश्यक आहे. तसेच आठवड्यातून एकदा शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पाण्याचे स्नान घालून पुतळ्याची स्वच्छता राखणे आवश्यक असल्याचे निखिल रतन मांडवे यांनी निवेदनात म्हटले आहे.
महापालिका प्रशासनाने तातडीने या शिवछत्रपतींच्या पुतळ्याशी नवी मुंबईकरांच्या निगडीत असलेल्या भावना लक्षात घेवून तातडीने संबंधितांना योग्य ते निर्देश द्यावेत, अशी मागणी करून निखिल मांडवे पुढे म्हणाले की, आपणास यापूर्वी याच विषयाबाबत 13 ऑक्टोबर 2016 रोजी लेखी निवेदन देवून या समस्येचे गांभीर्य आपल्या निदर्शनास आणून दिले होते. तथापि आपणाकडून याप्रकरणी आम्हाला कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही आणि कोणत्याही स्वरूपाची कार्यवाहीस सुरूवात झालेली नाही. यामुळे आम्हाला नाईलाजाने याच विषयास्तव आपणास पुन्हा एकवार निवेदन सादर करावे लागत आहे. समस्येचे गांभीर्य व शिवप्रेमींची या शिवछत्रपतींच्या पुतळ्याशी जुळलेली भावनिक नाळ लक्षात घेता आपण तातडीने हालचाली कराल, ही अपेक्षा निखिल मांडवे यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे.