नवी मुंबई : नेरूळ पश्चिम येथील पामबीच मार्गालगत असलेल्या तलाव परिसरात महापालिका प्रशासनाने ज्वेल ऑफ नवी मुंबई विकसित केले आहे. त्या परिसरातील वृक्ष पाऊस व त्यातील वार्यामुळे फांद्या पडू लागल्या आहेत. यामुळे अपघात होवून कोणत्या प्रकारची जिवितहानी होवू नये यासाठी समाजसेवक रवींद्र भगत यांनी नवी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाच्या उपायुक्तांकडे एका लेखी निवेदनातून ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसराचा सर्व्हे करून वृक्षांची छाटणी करण्याची मागणी केली आहे.
नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात दररोज हजारोच्या संख्येने स्थानिक तसेच सभोवतालच्या परिसरातील रहीवाशी (ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरूष, युवक-युवती, लहान मुले, छायाचित्रकार तसेच पर्यटकही) या ठिकाणी सकाळ, दुपार आणि संध्याकाळच्या वेळी वॉक करण्यासाठी, धावण्यासाठी, फिरण्यासाठी, निसर्गरम्य परिसरात थकवा घालविण्यासाठी, पक्ष्यांचे फोटो काढण्यासाठी येत असतात. त्यामुळे सकाळपासून रात्रीपर्यत या परिसरात वर्दल असल्याचे रवींद्र भगत यांनी निवेदनात म्हटले आहे.
सध्या पाऊसाचे दिवस सुरू असून वाराही जोरदार वाहत आहे. या ठिकाणी काही वृक्ष तसेच वृक्षांच्या फांद्याही तुटून पडल्या आहेत. सुदैवाने आतापर्यत या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवितहानी झालेली नाही. अजून अडीच महिने पावसाळा बाकी आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शक्य तितक्या लवकर पालिका प्रशासनाने या परिसराचा सर्व्हे करून संभाव्य अपघात टाळण्यासाठी धोकदायक वाटणार्या वृक्षांची तसेच फांद्याची छाटणी करण्याची मागणी रवींद्र भगत यांनी केली आहे.