नवी मुंबई : अधिकारी नगरसेवकांनी सुचविलेली कामे करत नाहीत. वाशीमध्ये कंत्राटी कामगार प्रतीविभाग अधिकारी झाला आहे. मुख्यालयात ईआरपीसाठी महिला कर्मचारी नगरसेवकांकडूनही पैसे मागत आहे. आरटीआय कार्यकर्ते व अधिकाऱ्यांची मिलीभगत असून पैसे वसुलीची कामे सुरू झाली आहेत. प्रशासनाकडून लोकशाहीची थट्टा सुरू असून विकासकामे होत नसल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला असून प्रशासनास धारेवर धरले.
काँगे्रसच्या नगरसेविका अंजली वाळुंज यांनी सर्वसाधारण सभेमध्ये अधिकाऱ्यांच्या मनमानीविरोधात लक्षवेधी सूचना मांडली होती. अधिकारी लोकप्रतिनिधींचा मान राखत नाहीत. त्यांनी सुचविलेली जनहिताची कामे केली जात नाहीत. वाशी विभाग कार्यालयाचा कारभार कंत्राटी साफसफाई कामगार अनिल पाटील चालवत आहे. जोरदार वसुली सुरू आहे. शिक्षण विभागात विठ्ठल कराड नावाच्या कर्मचाऱ्याची चौकशी करण्याची आवश्यकता असल्याची मागणी त्यांनी यावेळी केली. उपमहापौर अविनाश लाड यांनी प्रशासनाकडून लोकशाहीची थट्टा सुरू आहे. प्रशासनावर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. सचिव विभागाच्या भोंगळ कारभारामुळे उपमहापौर कार्यालयामध्ये शिपाई उपलब्ध होत नाही. पाहुणे आल्यास स्वत:ला पाणी द्यावे लागत आहे. तीन दिवसांपासून गाडी गॅरेजमध्ये असून दुसरी गाडी उपलब्ध करून दिलेली नाही. वाशीमध्ये नाल्यावर अनधिकृत मार्केट उभारण्यात आले आहे. मार्केट उभारताना आरोग्य, नगररचना व विधी विभागाचा अभिप्राय घेतलेला नाही. या तीनही विभागाने नाल्यावर मार्केट उभारता येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. यानंतरही १ कोटी खर्च करून मार्केटसाठी शेड उभारले जात आहे. प्रशासनाने नाल्यावरील मार्केट हटविले नाही तर उपोषण करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
शिवसेना नगरसेवक एम. के. मढवी यांनी प्रशासनाच्या अनागोंदी कारभारावर टीका करताना गंभीर आरोपही केले. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आरटीआय कार्यकर्त्यांना हाताशी धरून वसुली सुरू केली आहे. आरटीआयचे काही दलाल तक्रारी करत असून त्या तक्रारींच्या आधारे तोडपाणी केली जात आहे. डोंगरी, चेंबूर, मालाडमध्ये जावून पैसे वसूल केले जात असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. पालिकेत विकासकामांची फाईल तयार झाल्यानंतर ती ईआरपी प्रणालीमध्ये टाकणे आवश्यक असते. या प्रणालीमध्ये काम करणारी शोभा नावाची कर्मचारी १ लाख रूपयांची फाईल असेल तर १ हजार रूपयांची मागणी करत आहे.
नगरसेवकांनी सांगूनही पैसे घेण्याचे बंद केलेले नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. सभागृह नेते जयवंत सुतार यांनीही प्रशासनावर टीका केली.
**************
नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना आयुक्त रामास्वामी एन.यांनी सविस्तर उत्तर दिले. महापालिका क्षेत्रात समतोल विकास करण्यास प्राधान्य दिले जात आहे. यापूर्वी प्रभागनिहाय किती काम झाले याविषयी तपशील संकलित केला जात नव्हता. आता प्रभागनिहाय विकासाची माहिती संकलित केली जात आहे. प्रभागातील छोटी कामेही मार्गी लागावी यासाठी वेळ पडल्यास स्वत: प्रभाग समितीच्या बैठकीस उपस्थित राहील. रुग्णालयाच्या इमारतींचे बांधकाम झाले आहे. परंतु उपकरणे व मनुष्यबळामुळे त्या पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत. शासनाकडून कर्मचारी भरतीविषयीचा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. शिक्षण, आरोग्यासह सर्व प्रश्न सोडवून शहराचा विकास करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना पूर्ण संधी दिली जात असून त्यानंतरही कामात सुधारणा झाली नाही व चुकीचे काम केल्यास कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.
****
नगरसेवकांनी व्यक्त केलेल्या भावनांचा आदर राखून प्रशासनाने कामे केली पाहिजेत. पुन्हा तक्रार करण्याची वेळ येवू देवू नये.
– सुधाकर सोनावणे, महापौर
******
नोकरशाही हावी होत चालली आहे. प्रशासनावर कोणाचा अंकुश राहिलेला नाही. वाशीमध्ये नियमबाह्यपणे गटारावर मंडईचे काम केले जात असून ते न थांबविल्यास उपोषण करणार.
– अविनाश लाड, उपमहापौर
****
प्रशासन नगरसेवकांची अडवणूक करणार असेल तर आम्हालाही कडक भूमिका घ्यावी लागेल. कामचुकार व चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर आम्हाला शास्ती लावावी लागेल.
– जे. डी. सुतार,
सभागृह नेते
******
गरीब रुग्णास शरीराचा वास येत असल्याचे कारण देवून नेरूळ रुग्णालयातून हकलण्यात आले. गरिबीची थट्टा करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.
– रवींद्र इथापे,
नगरसेवक, प्रभाग १००
****
विभाग कार्यालय व समाज मंदिराचे रखडलेले काम पूर्ण होत नाही. स्कायवॉकसाठी दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही फाईल हलत नाही.
– प्रकाश मोरे, प्रभाग ५८
*****
प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांकडून येथील अधिकारी, कर्मचारी व नगरसेवकांनाही दुय्यम वागणूक मिळत आहे.
– रूपाली निशांत भगत,
नगरसेविका, प्रभाग ७८
*****
प्रभागामधील छोटी-मोठी कामेही होत नाहीत हे दुर्दैवी आहे. पाठपुरावा करूनही प्रशासन लक्ष देत नाही.
– स्वप्ना गावडे,
नगरसेविका, प्रभाग ९८
*****
दोन वर्षांमध्ये काहीच कामे झालेली नाहीत. मनपा कार्यालयातून फाईल गायब होत आहेत. फाईल ठेवण्यासाठी पुरेशी जागाही नाही.
– हेमांगी सोनावणे,
नगरसेविका,
प्रभाग १७
*****
प्रशासनाची वास्तव बाजू सर्व नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिली आहे. आमच्या प्रभागात श्री सदस्य स्वखर्चाने स्वागत कमान बांधत असून त्याकडे दुर्लक्ष करत आहे.
– सुनील पाटील,
नगरसेवक, प्रभाग ९२
***
तुर्भे माता बाल रुग्णालय अनेक वर्षांपासून बंद आहे. रुग्णालय सुरू झाले नाही तर आता आम्हाला आंदोलन करावे लागेल.
– संगीता वास्के,
नगरसेविका, प्रभाग ६९
***
अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण स्वत:ला आयुक्त समजू लागले आहेत. आमच्या प्रभागातील प्रत्येक कामात अडवणूक सुरू आहे.
– मंदाकिनी रमाकांत म्हात्रे,
नगरसेविका, प्रभाग २४
****
अधिकारी काम करत नसल्याने आम्हाला नागरिकांसमोर जाण्याची भीती वाटत आहे. काय पाप केले व निवडून आलो असे वाटू लागले आहे.
– वैजयंती दशरथ भगत,
नगरसेविका, प्रभाग – ७७
***
नोसिल नाकावासीयांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. पाठपुरावा करूनही कामे केली जात नाहीत.
– मोनिका पाटील, प्रभाग २८
***
ठराव मांडून व पाठपुरावा करूनही कामे होत नाहीत. आमच्या प्रभागात भाजीमंडई उभारण्यास दिरंगाई होत आहे.
– सुनीता रतन मांडवे, प्रभाग ८७
**
डॉक्टरअभावी रुग्णालये ओस पडली आहेत. शहरवासीयांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळत नाहीत.
– मनोज हळदणकर,
स्वीकृत नगरसेवक, शिवसेना
***
अधिकारी व आरटीआय कार्यकर्त्यांचे रॅकेट सुरू आहे. कार्यकर्ते तक्रारी करतात व अधिकारी पैसे घेवून मांडवली करत आहेत. मुंबई, ठाण्यापर्यंत जावून वसुली सुरू आहे.
– एम. के. मढवी, प्रभाग १८
*****
रस्ते, पदपथ, गटारांची दुरवस्था झाली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
– भारती पाटील, प्रभाग ४४
******
तलावावर सुरक्षारक्षकाची मागणी करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तरुणाचा बुडून मृत्यू झाला.
– सरोज पाटील, प्रभाग १०१
***************
आरोग्य व शिक्षणाची स्थिती बिकट आहे. या दोन विभागांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
– संजू वाडे, प्रभाग १२
*****
परवाना, नगररचना व विधी विभागाचा एकमेकांमध्ये समन्वय नाही. नोटीस पाठवून हॉटेलचालकांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई सुरू आहे.
– किशोर पाटकर, प्रभाग ६१
******
पालिकेत कनिष्ठ अभियंत्यांची कमतरता असल्याने कामावर परिणाम होत आहे. प्रशासनाने कामाची गती वाढविली पाहिजे.
– नामदेव भगत,
नगरसेवक, प्रभाग ९३
***************
अधिकारी लोकप्रतिनिधींना जुमानत नाहीत. अनिल पाटील हा सफाई कामगार विभाग कार्यालय चालवत असून फेरीवाल्यांना अभय देत आहे.
– अंजली वाळुंज,
नगरसेविका प्रभाग ६२
(साभार – लोकमत)