कळंबोली, कामोठे, खांदा कॉलनी आणि रोडपाली परिसरातील महावितरणच्या समस्यांवर ‘संघर्ष’ची विस्तृत चर्चा
पनवेल : मागील महिन्यात काही तांत्रिक बिघडामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागला, त्यातून मार्ग काढत आहोत. येत्या सहा महिन्यात महावितरणविरोधी तक्रारींचा आलेख शून्यावर आणणार, अशी ग्वाही महावितरणचे कळंबोली उपविभागीय कार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी दिली.
पनवेल संघर्ष समितीने कळंबोली, कामोठे, खांदा कॉलनी, रोडपाली आदी परिसरातील विद्यूत विभागाकडून सातत्याने होणार्या त्रासाची जंत्री पाटील यांची भेट घेवून वाचली.
गेल्या महिन्यात महावितरणच्या तळोजे येथील यंत्रणेत मोठा बिघाड निर्माण झाला होता. खोपोली, खालापूर, पनवेल येथील महावितरणचे कर्मचारी बोलावून त्यातून मार्ग काढला. समस्या फारच गंभीर होती. एका एका ठिकाणी 50 ते 60 कामगार नियुक्त केले होते. त्या समस्येला महावितरणने ‘भूताटकी’ असे नाव दिले होते, अशी माहिती देत आता बर्यापैकी समस्यामुक्त परिसर केला आहे. अद्याप नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण झाले नाही. त्याकरिता आराखडा तयार केला आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती पाटील यांनी दिली.
महापालिका क्षेत्रात विद्युत वाहिन्या भूमिगत असाव्यात, त्याकरिता महापालिका आणि महावितरण यांनी सयुंक्तिकपणे निधीचे नियोजन करावे, असा प्रस्ताव संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी ठेवला. पनवेलसंदर्भात तो निर्णय अंमलबजावणीच्या उंबरठ्यावर असल्याचे कडू यांनी सांगितले.
विद्यूत देयकांबाबत तीव्र नाराजी आणि सरसकट बिलाच्या रकमेबाबत प्रचंड धूसफूस असल्याचे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. अशा काही तक्रारी असल्यास आपले सहकारी अभियंता आहेत त्यांना भेटावे. त्यांच्याकडून समाधान न झाल्यास ग्राहकांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा. 24 तास जनतेच्या सेवेसाठी आम्ही तत्पर आहोत, असे पाटील यांनी सांगितले.
यावेळी संघर्षचे अध्यक्ष कांतीलाल कडू, जेष्ठ सदस्या माधुरी गोसावी, कुंदा गोळे, पराग बालड, सीमा पाटील, भारती जळगावकर, ऍड. संतोष सरगर, वैशाली सुर्वे, रूपा शिवथरे, मंगल भारवड, रमेश फुलोरे, अमित पंडीत व सयाजी गायकवाड आदीजण उपस्थित होते.