संघर्ष समितीने केली खड्ड्यांची पोलखोल
स्वंय न्युज ब्युरो : 8369924646
नवी मुंबई : पनवेल-सायन महामार्गावर पडलेले खड्डे त्वरीत न बुजल्यास होणार्या अपघाताला आपल्याला जबाबदार धरले जाईल, असा सज्जड दम कळंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. आर. पोपेरे यांनी टोल कंपनीला पाठविलेल्या नोटिसीमधून दिला आहे.
पनवेल-सायन महामार्गावर खारघर ते कळंबोली क्षेत्रात मोठ मोठे खड्डे पडल्याने दररोजच अपघात होत आहेत. अनेकांना जीव गमवावा लागत आहे. काही जण जायबंद होत आहेत. खड्डे चुकविण्यासाठी वाहनांची कसरत होताना वाहतुकीची कोंडी होत आहे. यासंदर्भात पनवेल सायन टोल कंपनी कानाडोळा करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी संघर्ष समितीने पोपेरे यांच्याकडे केली.
त्यांनी तात्काळ, त्यांचे स्वीय सहाय्यक अंंकुश म्हसकर यांना सांगून टोल कंपनीला सणसणीत शब्दात नोटिस बजावण्याचे आदेश दिले आहेत. महामार्गावर मोठाले खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. खड्ड्यांचे जाळे विणावे, अशी परिस्थिती तिथे निर्माण झाली आहे. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याला नोटिस बजावून जागे करण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोपेरे यांनी सांगितले. त्यांनी अद्याप दूर्लक्ष केले असल्याने आता अपघात घडल्यास टोल कंपनीवर गुन्हा दाखल करावा लागेल, अशी उद्विग्न प्रतिक्रिया वरिष्ठ पोलिस निरीक्षक पोपेरे यांनी व्यक्त केली.
पोलिसांना त्यांच्या कक्षेबाहेरील कामे करावी लागत असल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली. महिला आणि बालकांच्या गुन्ह्यात साक्षिदार होण्यासाठी महिलांनी पुढे येणे गरजेचे आहे. परंतु, तसे होताना दिसत नाही. माधुरी गोसावी यांचे काम चांगले आहे. त्या आम्हाला नेहमीच मदत करण्यास तत्पर असतात. इतर महिलांनी त्यांच्यासारखीच पोलिसांना मदत केल्यास अनेक गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होईल, असे सांगितले.
यावेळी पोलिस ठाण्याच्या महिला दक्षता कमिटीमध्ये समाजिक क्षेत्रात काम करणार्या महिलांचा समावेश करावा आणि समाज आणि पोलिसांंमध्ये सुसंवाद ठेवून दरी कमी करण्याचा प्रयत्न व्हावा, असे मत मांडण्यात आले.
पोपेरे यांच्या भेटीसाठी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू, माधुरी गोसावी, कुंदा गोळे, पराग बालड, सिमा पाटील, मंगल भारवाड, रमेश फुलोरे, वैशाली सुर्वे, रूपा शिवथरे, अमित पंडित, भारती जळगावकर आणि सयाजी गायकवाड कळंबोली पोलिस ठाण्यात गेले होते.