पनवेल : ओएनजीसी व्यवस्थापनाने कामावरून कमी केलेल्या कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.
ओएनजीसीच्या पनवेल येथील आस्थापनेमध्ये कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या 46 कामगारांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता दिनांक 10 जुलै 2017 पासून कामावरून कमी करण्यात आले होते. ओएनजीसी आस्थापनेमध्ये कमी केलेले 46 कर्मचारी हे स्थानिक प्रकल्पग्रस्त असून कामावरून कमी केल्याने त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन नष्ट झाले होते. शिवाय ओएनजीसीची दीर्घ कालावधीची सेवा करूनही त्यांना अचानकपणे कामावरून कमी केल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला होता. या संदर्भात प्रकल्पग्रस्त सामाजिक विकास संस्थेला संस्था व कामगारांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना साकडे घातले होते.
सदैव मदतीसाठी व न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर असलेले आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामगार व प्रकल्पग्रस्त सामाजिक विकास संस्थेला पाठिंबा देत आंदोलनात उतरण्याचा इशारा ओएनजीसीला दिला होता. ओएनजीसी व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार आणि कंत्राटदाराची हुकूमशाही याचा तीव्र निषेध भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपतर्फे सर्व लोकप्रतिनिधी कार्यकर्ते आणि प्रकल्पग्रस्तांनी गुरुवारी (दिनांक २० जुलै) काळुंद्रे येथील ओएनजीसी गेटवर जाऊन केला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला यश आले असून व्यवस्थपनाने कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याचे मान्य केले तसेच प्रशासनाने सर्व कामगारांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत ओएनजीसीमध्ये प्रवेश दिला. यावेळी कामगारांनी तसेच संस्थेने आमदार प्रशांत ठाकूर व इतर लोकप्रतिनिधींचे आभार व्यक्त केले.
यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल,उपमहापौर चारुशीला घरत,गटनेते परेश ठाकूर,सर्व आजी माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव,भाजप युवामोर्चाचे प्रदेश सचिव विक्रांत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत,सरचिटणीस दशरथ म्हात्रे,प्रल्हाद केणी,पनवेल ,कामोठे शहराध्यक्ष डॉ अरुणकुमार भगत,खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल,प्रभाकर जोशी,विजय पाटील, अनेश ढवळे, प्रकल्पग्रस्त सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष गणेश घरत, उपाध्यक्ष जगदीश परदेशी, खजिनदार विशाल म्हसकर, यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्ते आणि प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले कि,येथील भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढवून विविध प्रकल्पांसाठी भूसंपादन केल्या आहेत आणि प्रकल्पग्रस्तांना रोजगारापासून वंचित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे सातत्याने संघर्ष करूनच प्रकल्पग्रस्तांना आपला हक्क मिळवावा लागत आहे. प्रकल्पग्रस्त शिक्षणाने आणि अनुभवाने कमी असतील मात्र त्यांनी आपली जमीन ओएनजीसी प्रकल्पासाठी दिलेली आहे. त्यामुळे त्यांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे.प्रकल्पग्रस्तांच्या वारसांनासुद्धा प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून देणे हि ओएनजीसीची जबाबदारी आहे. येथील केंद्रीय विद्यालयात प्रकल्पग्रस्तांना प्रवेश नाकारला जातोय,लोकप्रतिनिधींना ओएनजीसी कॉलनीत प्रवेश करण्यास मज्जाव केला. तो याच ओएनजीसी व्यवस्थापनाच्या भोंगळ कारभाराचा आणि कंत्राटदाराच्या हुकूमशाहीचा आम्ही निषेध करीत आहोत. केंद्रीय विद्यालयात प्रकल्पग्रस्तांना राखीव कोटा ठेवा तसेच प्रकल्पग्रस्तांच्या वारसांनासुद्धा ओएनजीसीमध्ये सामावून घेण्यासंदर्भात आठवड्यात बैठक बोलवा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. केंद्रात आणि राज्यात भाजपचे संवेदनशील सरकार आहे. त्यामुळे बरीच कामे संघर्ष आणि आंदोलनाशिवाय होत आहेत. मात्र कांही ठिकाणचे प्रशासन हे चहापेक्षा किटली गरम असे आहे. या गरम किटल्यांवर थंड पाणी कसे ओतायचे हे भाजपला माहिती आहे अशी कोपरखळीही त्यांनी यावेळी ओएनजीसी प्रशासनाला मारली.
पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर चारुशीला घरत यावेळी म्हणाल्या कि, येथील प्रशासन प्रकल्पग्रस्तांमध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक येथे दिली जात नाही त्यामुळे ओएनजीसीच्या मुजोर प्रशासनाचा तीव्र निषेध केलाच पाहिजे.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यावेळी म्हणाले कि, ज्या प्रकल्पग्रस्त कामगारांनी २८ ते ३० वर्षे सेवा दिली त्यांना तडकाफडकी काढून टाकण्याचा अन्याय ओएनजीसीने केला आहे. भाजप सरकारचे धोरण उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणे हेच आहे. मात्र येथील प्रकल्पग्रस्ताच्या छाताडावर उद्योग नाचायला लागले तर त्यांचे कामकाज आम्ही चालू देणार नाही. प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना शाळेत प्रवेश,रोजगाराभिमुख प्रशिक्षण,रोजगारात प्राधान्य,सामाजिक सुरक्षा हे मूलभूत हक्क ओएनजीसी प्रशासनाला कर्मचाऱ्यांना द्यावेच लागतील असेही ते यावेळी म्हणाले.