नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये कच-याचे वर्गीकरण हे कचरा निर्माण होणा-या ठिकाणीच करून ओला कचरा हिरव्या कचरा कुंडीत व सुका कचरा निळ्या कचरा कुंडीत टाकणे नागरिकांना बंधनकारक करण्यात आले असुन कच-यावर सेंद्रिय अथवा जैविक पध्दतीने प्रक्रिया करणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाचे उप आयुक्त श्री. तुषार पवार,परिमंडळ-1 चे उप आयुक्त श्री.दादासाहेब चाबुकस्वार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
सदर मोहिमेच्या अनुषंगाने 20/07/2017 रोजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या बेलापुर विभाग कार्यक्षेत्रातील संभाजीनगर झोपडपट्टी भागामध्ये रहिवाश्यांना कच-याचे वर्गीकरण हे कचरा निर्माण होणा-या ठिकाणीच करून ओला कचरा हिरव्या कचरा कुंडीत व सुका कचरा निळ्या कचरा कुंडीत टाकणे, तसेच कच-यावर सेंद्रिय अथवा जैविक पध्दतीने प्रक्रिया करणे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेस बेलापूर विभागामधील स्वच्छता निरीक्षक श्री.सुभाष म्हसे, स्वच्छता निरीक्षक श्रीम. कवीता खरात, उप स्वच्छता निरीक्षक श्री. मिलींद तांडेल, उप स्वच्छता निरीक्षक श्री. रवींद्र चव्हाण, विभागातील कर्मचारी, स्वच्छताग्रही व नागरीक मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.