स्वयं न्युज ब्युरो : 8369924646
नवी मुंबई : पनवेलमधील रिक्षा मीटरप्रमाणे आतातरी चालणार का हा प्रश्न पनवेलकरांना सतावतोय. त्यातच नव नव्या विषयांची भर पडत आहे. जवळची भाडी नाकारणे,वाट्टेलतसे पैसे आकाराने,नाईट चार्जच्या नावाखाली जास्त पॆशांची मागणी करणे त्यापासूनही प्रवाशांची सुटका झालेली नाही. शहरात अनेक ठिकाणी अवैध रिक्षा थांबे असून वाहतुकीस त्यांचा अडथळाही होत आहे. या सर्वाला शिस्त लागलीच पाहिजे मात्र या सर्व गैरसोयीत भर म्हणून स्वार्थी आणि झटपट जास्त पैसे मिळविण्याच्या लोभापोटी पनवेल रेल्वेस्थानकातील रिक्षाचालकांनी मनमानी कारभार सुरु केला आहे. प्रवाशांना गाडीत बसवून भाड्याचे पूर्ण पैसे घेऊन जबरदस्ती शेअरिंगने जाण्यास सध्या रिक्षावाले भाग पाडत आहेत.
पनवेल रेल्वे स्थानक आशिया खंडातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक होत आहे. हार्बर रेल्वेचे शेवटचे महत्वाचे स्थानक म्हणून याकडे सध्या पाहिले जाते. लाखो प्रवाशी येथून ये जा करीत असतात. जुन्या पनवेलला जाणाऱ्या प्रवाशांना ३० ते ४० रुपये भाडे ठरलेले आहे. वास्तविक हे भाडे रिक्षा चालक मालक संघटनांनीच प्रवाशांवर लादलेले आहे. कारण पनवेलमध्ये मीटरप्रमाणे रिक्षा चालत नाहीत. असे असले तरी या भाडेदरचा फलक कुठेही लावलेला आढळत नाही. त्यामुळे रिक्षाचालक जेवढे म्हणेल तेवढे भाडे देणे हे अपरिहार्य असते. त्यातच भर म्हणून पनवेल रेल्वेस्थानकातील रिक्षाचालकांनी झटपट श्रीमंत होण्याचा नवा फंडा शोधून काढला आहे. समोरून येणाऱ्या प्रवाशांना ते कुठे जाणार ? विचारतात त्यानुसार नंबर लावलेल्या गाडीत बसवतात. मात्र हि रिक्षा तात्काळ सुरु न करता एखाद दुसरा त्याच वाटेवरील प्रवाशी घेऊन दोघांकडून चोख ३० ते ४० रुपये घेतात. असा अनुभव कांहीप्रवाशांनी घेतल्यानंतर आमच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष खात्री केली तेंव्हाही असाच प्रकार घडला.त्यामुळे या बेशिस्त वर्तणुकीला आळा बसावा अशी मागणी प्रवाशी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत.
पनवेल एस टी स्थानकाला रिक्षावाल्यांची वेढा घातलेला आहे. सदर अनधिकृत रिक्षा थांब्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. मात्र प्रवाशांची सोय होते म्हणून सर्वजण त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. याची जाणीव रिक्षाचालकांना नसल्यामुळे ते वाट्टेल तसे पैसे आकारून प्रवाशांना नाडण्याचे काम करतात. मीटरप्रमाणे रिक्षा चालविण्यासाठी याच रिक्षा चालकांनी पुढाकार घ्यावा अन्यथा ओला,उबेर सारख्या कंपन्या पनवेलमध्ये आपले बस्थान बसवतील तेंव्हा वेळ गेलेली असेल असेही आता प्रवाशी बोलू लागले आहेत.
शेअर रिक्षा हा प्रवाशांच्या खिशाला परवडणारा प्रकार आहे. सामंजस्याने थोडा वेळ वाट बघून एकाच मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांची सोय यामुळे होते. यामध्ये पैशाची बचत होते. मात्र वेळेला पैशापेक्षा महत्व देणारे संपूर्ण तीन शिटचे पैसे देऊन स्पेशल रिक्षा करून जात असतात. शेअरींगचे जसे दर ठरलेले आहेत तसेच स्पेशल रिक्षाचेही दर ठरलेले आहेत. मात्र सध्या पनवेल रेल्वे स्थानकातील रिक्षा चालक संपूर्ण स्पेशल रिक्षाचे भाडे घेऊन शेअरिंगने प्रवाशी वाहतूक करीत आहेत. त्यामुळे सध्या प्रवाशांमध्ये नाराजी आहे. रिक्षा चालकांच्या एकंदरीतच मनमानी कारभाराबाबत ठोस उपाययोजना व्हायला हवी असे प्रवाशी मागणी करीत आहेत.