स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
नवी मुंबई : सिडकोद्वारा ऐरोली नोडमधील अनधिकृत बांधकाम निष्कासित उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व 2012 च्या जनहित याचिका क्रमांक 138 नुसार सिडको किंवा महाराष्ट्र शासनातर्फे कोणताही विकास परवाना न घेता बांधकाम करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयातर्फे देण्यात आले आहे. सिडकोने व महाराष्ट्र शासनाने या अनाधिकृत बांधकाम विषयी न्यायलयात याचिका दाखल केली होती. अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवराज एस. पाटील, सिडको व सिडको (उत्तर) अनधिकृत बांधकाम विभाग यांच्यातर्फे 24 जुलै रोजी ऐरोली नोड, येथील अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची मोहिम राबविण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत ऐरोली नोड सेक्टर 9बी दिवे मधील उच्च दाबाच्या विद्युतवाहिनी खाली असलेले अनधिकृत दोन स्टॉल, पक्के बांधकाम असलेला चायनीज ढाबा यावर कारवाई करण्यात आली असून,संबंधित जागा रिक्त करण्यात आली. त्याचप्रमाणे सेक्टर 9 डी येथील प्लॉट क्रमांक 33 ते 38 मध्ये पोस्टर बनविणार्या अनधिकृत शेड वर निष्कासनाची कारवाई करुन जागा रिक्त करण्यात आली. उच्च दाबाच्या विद्युतवाहिनी खाली असणारे बेकायदेशीर पार्किंग शेड, गॅरेज, आणि क्रिकेटाच्या खेळाडूंसाठी असलेले शेड यांच्यावरही कारवाई करण्यात आली.
सेक्टर 11 प्लॉट क्रमांक 5 मधील पक्के बांधकाम, दोन शेड आणि नर्सरी निष्कासित करून, सदर जागा रिक्त करण्यात आली आहे. सेक्टर 8अ येथे देखील उच्च दाबाच्या विद्युतवाहिनी खालील चायनीज ढाबा आणि नर्सरीवर कारवाई करुन संबंधित जागा रिक्त करण्यात आली. सदर बांधकामे सिडकोतर्फे कोणताही विकास परवाना न घेता सिडकोच्या जमिनीवर अतिक्रमण करून बांधण्यात आली असल्याने सिडकोतर्फे निष्कासित करण्यात आली.
सदर मोहिम अनधिकृत बांधकाम नियंत्रक (उत्तर) पी.बी.राजपूत , सहाय्यक अनधिकृत बांधकाम नियंत्रक गणेश झिने, सहाय्यक अनधिकृत बांधकाम नियंत्रक चिडचले सहाय्यक कार्यकरी अभियंता एम.सी.माने सहाय्यक विशेष नियुक्त अधिकारी धोंडे यांच्या पथकाने तीव्र विरोधाला सामोरे जाऊन मोहीम सुलभरित्या पार पाडली.
रबाळे पोलिस स्थानकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदिप तिदर पोलिस निरिक्षक एस.के. धुरी व 100 पोलिस यांच्या सहकार्यामुळे अतिक्रमणाची कारवाई यशस्वीरीत्या करण्यात आली. तसेच मोहिमेच्या ठिकाणी सिडकोचे पोलिस कर्मचारी, सिडकोचे सुरक्षा अधिकारी सुरवसे व इतर सुरक्षा रक्षक उपस्थित होते. या कारवाईसाठी 1 पोकलेन, 1 ट्रक, 1 जेसीबी, 2 एअर ब्रेकर्स,1 गॅस कटर, 1 टोविंग व्हॅन 6 जीप व 20 कामगार यांची नियुक्ती करण्यात आली होती.