मुंबई : शेतकरी कर्जमाफी योजनेत पूनर्गठित कर्जाचा समावेश करणे आणि कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्जाची अट शिथिल करून ऑफलाइन अर्ज भरण्यासंदर्भात सरकारचा निर्णय म्हणजे विरोधी पक्षांनी विधिमंडळात घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे यश असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी शेतकरी कर्जमाफी योजनेत सुधारणा करण्यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली होती. या कर्जमाफीच्या वर्तमान प्रारूपावर शेतकऱ्यांनीही तीव्र आक्षेप नोंदवला होता. यानंतर सरकारने 2015-16 मध्ये पूनर्गठित झालेल्या शेतकऱ्यांचा कर्जमाफी योजनेत समावेश करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे विरोधी पक्षांनी ऑनलाइन अर्जाच्या सक्तीवरही तीव्र आक्षेप नोंदवला होता. त्यानुसार सरकारने ही अट शिथिल करून ऑफलाइन अर्ज भरण्यास मान्यता दिली आहे. कर्जमाफी योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी विरोधी पक्ष यापुढेही आक्रमक पद्धतीने संघर्ष करीत राहिल, असेही विखे पाटील यांनी म्हटले आहे.