स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
पनवेल : पनवेल-सायन महामार्गावरील अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले.
पनवेल-सायन महामार्गावरील अनेक पथदिवे बंद असल्याने व महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक व नागरिकांना नाहक त्रास होत असून महामार्गावरील अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होऊन जीवित हानी व वित्त हानी झाल्याचे जून २०१७ मध्ये निदर्शनास आले आहे. सायन पनवेल टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला बांधा-वापरा-हस्तांतरित करा (बीओटी) तत्वावर या महामार्गाचे काम देण्यात आले असून महामार्गावरील सर्व दुरुस्तीची कामे केली जात नसल्याचे व याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. या प्रकरणी शासनाने केलेल्या चौकशीनुसार पनवेल-सायन महामार्गावर होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी व महामार्गावरील देखभाल दुरुस्तीची कामे सदर कंपनीकडून घेण्याबाबत आणि या प्रकरणात दुर्लक्ष करणाऱ्या संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात आली आहे, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी दाखल केला होता.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रश्नावर दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले कि, सायन- पनवेल महामार्गावर मे व जून २०१७ मध्ये झालेल्या अपघातात दोन इसमांचा मृत्यू झालेला आहे. सदर रस्ता खाजगीकरणांतर्गत उद्योजक मे. सायन -पनवेल टोलवेज प्रा.ली. यांना देण्यात आला असून हा रस्ता व रस्त्यावरील पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी उद्योजकाची आहे. याबाबत उद्योजकास वारंवार लेखी तसेच तोंडी सूचना देण्यात आलेल्या आहेत. याबाबत रस्ता व रस्त्यावरील पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी उद्योजकास नोटीस देण्यात आली आहे. सदरची कामे करणे अनिवार्य असल्याने पथदिव्यांची दुरुस्ती उद्योजकाच्या जबाबदारीवर व खर्चाने (Risk & Amp; Cost) खात्यामार्फत करण्याची कार्यवाही हाती घेण्यात येत आहे. तसेच विभागामार्फत दरपत्रके मागवून रस्ते दुरुस्तीची कामे उद्योजकाच्या जबाबदारीवर व खर्चाने (Risk & Amp; Cost) करण्यात येत आहे.