स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
आमदार नरेंद्र मेहता यांची
मीरा भाईंदर : मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात अनेक इमारतींची अवस्था वाईट असून अशा मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी भाजपा पुढाकार घेईल, अशी ग्वाही मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी दिली आहे. मोडकळीस आलेल्या इमारतीत जीव मुठीत धरून राहणार्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी शक्य त्या सर्व स्तरावर आम्ही प्रयत्न करू असेही ते म्हणाले.
प्रत्येक नागरिकाचे स्वत:चे हक्काचे घर असावे,अशी भुमिका भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आहे. त्या अनुषंगाने मीरा भाईंदर महापालिकेत भाजपा सत्तेत आल्यास पंतप्रधानांच्या या भुमिकेला मूर्त रुप देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे सांगत नरेंद्र मेहता यांनी मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मुद्दा धसास लावण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात अंतर्भूत असलेल्या सीआरझेड क्षेत्रातील इमारती तसेच महापालिकेने धोकादायक म्हणून घोषित केलेल्या जुन्या इमारतींचा प्रश्न गंभीर बनला आहे. या शिवाय अनेक खाजगी इमारतीही धोकादायक स्थितीत असून मालक आणि भाडेकरूंच्या वादामुळे त्यांचा पुनर्विकास रखडला आहे. अशापरिस्थितीत या इमारतींमध्ये शेकडो कुटुंबे अक्षरश: जीव मुठीत धरून राहत आहेत.ही बाब लक्षात घेत मा. नरेंद्र मेहता यांनी या इमारतीच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपाच्या जाहिरनाम्यात आम्ही पुनर्विकासाच्या या मु्द्यांचा विस्तृतपणे ऊहापोह करणार आहोत, असे सांगत मेहता म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या पुनर्विकासाबाबतच्या विविध नियमांचा आधार घेत आम्ही हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत आहोत.
सीआरझेड कायदा अस्तित्वात येण्यापुर्वी किनारपट्टी क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती सीआरझेड कायद्यातून वगळाव्यात, यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने केंद्राकडे प्रयत्न करत आहोत. याशिवाय पुनर्विकासासाठी असलेली तीस वर्षांची मर्यादा कमी करून 25 वर्षे जुन्या इमारतींनाही पुनर्विकासाची परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही केली आहे, त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे मेहता म्हणाले. तसेच महापालिकेने धोकादायक म्हणून घोषित केलेल्या इमारतींना अडीच इतका अतिरिक्त एफएसआय मिळावा हाआमचा प्रयत्न आहे. ही बाब आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घेतली आहे. ठाण्यात क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी जसा चारचा एफएसआय देण्यात आला, तशाच पद्धतीची एखादी योजना मीरा भाईंदरसाठी तयार करण्याचा मनोदय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. एकूणच पुनर्विकास धोरणात आमुलाग्र बदल करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचेही मेहता म्हणाले.