स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
मीरा भाईंदर : मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून महापालिका मुख्यालयावर झेंडा फडकवण्यासाठी भाजपाने जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र आणि राज्य सरकारची गेल्या अडीच तीन वर्षांतील कामगिरी पाहता मीरा भाईंदर महापालिकेतही भाजपाचा विजय ही निव्वळ औपचारिकता असल्याची चर्चा आहे. भाजपाने केलेल्या कामगिरीच्या बळावर निवडणुकांना सामोरे जाताना एकिकडे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच, भाजपाकडून उमेदवारी मिळवू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांची संख्याही मोठी आहे. सक्षम उमेदवारांच्या अभावी इतर पक्ष हैराण असताना भाजपात मात्र उमेदवारीसाठी चांगलीच चुरस आहे.
मीरा भाईंदर महापालिकेच्या प्रभागातील ७८ जागांसाठी भाजपमध्ये तब्बल ३०० पेक्षाही अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. इतर पक्षांकडे उमेदवारांची वानवा असताना भाजपामध्ये मात्र प्रत्येक जागेसाठी किमान चार पर्याय उपलब्ध आहेत.इच्छुकांनी दाखवलेल्या या जबरदस्त प्रतिसादाबद्दल बोलताना मा. आमदार नरेंद्र मेहता म्हणाले की,केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर देशभरातील सर्वसामान्य जनता खुश आहे. केंद्र आणि राज्यातील भाजपच्या सरकारची जी कार्यपद्धती आहे, तशाच पद्धतीचा पारदर्शक कारभार मीरा भाईंदर महापालिकेतही करण्याचा आमचा प्रयत्न असेल.त्यामुळे मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील मतदारांना भाजपाकडून खुपच अपेक्षा आहेत. या अपेक्षांची पुर्तता करण्याची संधी आपल्याला मिळावी,अशी भाजपामधल्या अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांची इच्छा आहे. परिणामी आम्हाला उमेदवारीसाठी इच्छुकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.यामध्ये उच्चशिक्षित आहेत,व्यावसायिक आहेत,त्याचप्रमाणे महिला आणि तरूणांचे प्रमाणही मोठे आहे. नगरसेवक हा अभ्यासू असावा, त्याला आपल्या प्रभागातील समस्यांची चांगली जाण असावी, तसेच तो या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असावा ही सर्वसामान्य मतदारांची माफक अपेक्षा असते.मतदारांच्या आपल्या लोकप्रतिनिधीकडून जशा अपेक्षा असतात, त्याच पद्धतीने पक्षनेतृत्वाच्याही आपल्या उमेदवाराकडून काही अपेक्षा असतात.त्यामुळे मतदारांच्या आणि पक्षनेतृत्वाच्या या एकत्रित अपेक्षांच्या निकषांवर योग्य त्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
चौकट
गेल्या दोन दिवसात २६८ इच्छुकांच्या मुलाखती पुर्ण
बुधवारी मीरा भाईंदरच्या मावळत्या महापौर गीतांजली जैन यांनी भाजपच्या वतीने पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राज्यमंत्री मा. रविंद्र चव्हाण, मा. आ. नरेंद्र मेहता, मीरा भाईंदर शहर जिल्हाध्यक्ष मा. हेमंत म्हात्रे यांच्यासह हजारो कार्यकर्ते हजर होते. आतापर्यंत गेल्या दोन दिवसांत सर्व २६८ इच्छुकांच्या मुलाखती पुर्ण झाल्या असून येत्या दोन तीन दिवसांत उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे.