दिपक देशमुख
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेत वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालय मोडले जाते. परंतु याच ठिकाणातील दूरध्वनी सेवा बंद असेल तर काय होईल. याचा प्रत्यय गेल्या दोन दिवसापासून नागरिकांना येत आहे. त्यामुळे मनपाची आरोग्य सेवा किती तत्पर आहे. याचा प्रत्यय येत आहे. दरम्यान काही वेळेला फोन लागूनही टेलिफोन ऑपरेटर जागेवर नसल्याने फोन घेतला जात नसल्याचेही नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यास मिळत आहेत.
मनपाचे वाशी येथील रुग्णालय कोट्यवधी रुपये खर्च करून नवी मुंबई महानगरपालिकेला शोभेल अशी निर्मिती जरी केली असेल तरी रुग्णालायतील प्रशासनावर वरिष्ठ अधिकार्यांचा दुर्लक्ष असल्याने नागरिकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.सध्या या रुग्णालयात सहा टेलिफोन लाईन्स उपलब्ध असताना बेल वाजते परंतु फोन घेतला जात नसल्याचे वास्तव आहे.
फोन लागूनही उचलला जात नसल्याने अनेक नागरिकांना आपल्या उपचारासाठी रूग्णालयात दाखल असणार्या रुग्णांशी संपर्क साधता येत नसल्याचे संतोष बैल यांनी सांगितले. रुग्णालयात शिरल्यानंतर बहुतांशी मोबाईल लागत नसल्याने अनेकदा नागरिक फोन लावण्याचा प्रयत्न करतात. परंतु रुग्णालयातील फोन सेवा ठप्प झाल्यामुळे साहजिकच अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णालयातील फोन सेवा बंद असल्यामुळे डॉक्टर,नर्स तसेच रुग्णालयातील इतर कर्मचार्यांना भयानक त्रास होत असल्याचे आरोग्य सूत्रांनी माहिती दिली.
दूरध्वनी सेवा जेव्हा चालू असते अशा वेळी दूरध्वनी चालक अनेकदा आपले काम सोडून कुठे तरी गेलेला असतो अश्या वेळेला सुद्धा दूरध्वनी घेतला जात नसल्याचे गणेश पवार यांनी सांगितले.त्यामुळे दूरध्वनी चालकांना नेमून दिलेले काम त्यांनी योग्य रीतीने करावे अशी मागणी नागरिक करत आहेत. तसेच बंद असलेली सेवा पूर्ववत करावी अशी मागणीही होत आहे.