आमदार संदीप नाईक यांची आग्रही मागणी
मुंबई : वाशी आणि ऐरोली या दोन ठिकाणचे टोल अन्यायकारक असून ते नवी मुंबईकरांसाठी माफ करावेत, अशी आग्रही मागणी आमदार संदीप नाईक यांनी मंगळवारी औचित्याच्या मुद्याद्वारे विधानसभेत केली.
नोकरी, व्यवसाय, शिक्षण, वैद्यकीय उपचार तसेच इतर दैनंदिन कामांसाठी वाहनधारक नवी मुंबईकरांना दररोज मुंबई आणि ठाण्यात प्रवास करावा लागतो. त्यासाठी त्यांना ऐरोली ते मुंबई आणि वाशी ते मुंबई अशा दोन खाडीपुलांचा वापर करावा लागतो. या दोन्ही ठिकाणी टोलनाके असल्याने दोन टोलचा भुर्दंड त्यांना भरावा लागतो. वास्तविक टोल सोबतच १ टक्के ते ३ टक्क्यांच्या दरम्यान नवी मुंबईकर नागरिकांकडून पेट्रोलवर अधिभार देखील वसूल केला जातो. म्हणजेच टोलसोबतच इंधन अधिभाराचा फटका देखील त्यांना बसतो. हा नवी मुंबईकरांवर घोर अन्याय असल्याचे आमदार नाईक यांनी या मुद्यावर बोलताना सांगितले. या दोन्ही खाडीपुलांवर खडडे पडले असून त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. वाशी खाडीपुलाच्या खांबांवरील दिवे बंद आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी काळोख असतो. अशा परिस्थितीत वाहनचालकांना वाहने जिकिरीने चालवावी लागतात. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या पावसाळयात अपघातांचे प्रमाण वाढल्याचे आमदार नाईक म्हणाले. ऐरोली आणि वाशी येथील टोलनाके बंद व्हावेत यासाठी नवी मुंबईकरांची तीव्र स्वरुपाची आंदोलने देखील झाली आहेत, ही बाब आमदार नाईक यांनी शासनाच्या लक्षात आणून दिली. टोल आणि पेट्रोलअधिभार अशा दुहेरी आार्थिक फटक्यामुळे नवी मुंबईकरांमध्ये प्रचंड असंतोष असल्याचे नमूद करुन आमदार नाईक यांनी हे दोन्ही टोल नवी मुंबईकरांसाठी तातडीने माफ करावेत, अशी मागणी औचित्याच्या मुद्याद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आमदार नाईक यांनी यापूर्वी देखील विधीमंडळ अधिवेशनांमधून तारांकीत प्रश्न तसेच टोलप्रश्नी झालेल्या विशेष चर्चांमधून नवी मुंंबईकरांवर अन्यायकारक असलेले दोन्ही ठिकाणचे टोल बंद करावेत, अशी आग्रही मागणी केली होती.