सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन मिळावे व उत्सव आयोजनातून अभिप्रेत असलेली सामाजिक एकात्मभावना वृध्दींगत व्हावी यादृष्टीने प्रतिवर्षाप्रमाणेच याही वर्षी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दि. 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2017 या गणेशोत्सव कालावधीत ‘नवी मुंबई महापौर सार्वजनिक श्रीगणेश दर्शन स्पर्धा-2017’ आयोजित करण्यात येत आहे.
पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या भूमिकेतून यावर्षीच्या स्पर्धेत पर्यावरणपूरक (Eco-Friendly) गणेशोत्सव साजरा करणा-या श्रीगणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन देण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व संस्था / मंडळे यांनी दिनांक 20 ऑगस्ट 2017 पर्यंत नजिकच्या 8 विभाग कार्यालयात स्पर्धा प्रवेशिका दाखल करुन श्री गणेश दर्शन स्पर्धेत उत्स्फुर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात येत आहे.
स्पर्धा सहभागाकरीता संस्था / मंडळाची नोंदणी मा. धर्मादाय आयुक्तांकडे झालेली असणे आवश्यक असून अर्जासोबत नोंदणी प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत जोडावयाची आहे. गणेशोत्सवासाठी मंडप घातलेला असल्यास, नवी मुंबई महानगरपालिकेची रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त अधिकृत वीज कनेक्शनची परवानगी, अग्निशमन विभागाची परवानगी तसेच पोलीस यंत्रणेची ध्वनीक्षेपक वापर व इतर कायदा व सुव्यवस्था बाबींविषयक परवानगी घेणे आवश्यक आहे.
या वर्षीच्या गणेशोत्सवातून पर्यावरणशीलतेला प्रोत्साहन देण्याची महानगरपालिकेची भूमिका असून शाडूच्या मातीच्या अथवा इकोफ्रेंडली साहित्याच्या मूर्ती, सजावटीमध्ये इकोफ्रेंडली साहित्याचा वापर तसेच उत्सव कालावधीत पर्यावरणपूरक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करणा-या मंडळांना प्राधान्य दिले जाईल.
देखाव्यातील विषयांतून सामाजिक सलोखा वाढावा तसेच सांस्कृतिक मूल्यांची जपणूक व्हावी अशा प्रकारचे सादरीकरण असावे. स्पर्धेच्या परीक्षणामध्ये कलात्मकतेसोबत उद्देशाचाही विचार प्रकर्षाने केला जाईल.
स्पर्धा परीक्षण करताना पर्यावरणशील (Eco-Friendly) मूर्ती – सजावट व उपक्रम आयोजन, सजावट देखाव्यातील कलात्मकता तसेच समाजप्रबोधनात्मक संदेशमांडणी, परिसर स्वच्छता व टापटीप, शिस्तबध्दता, निधी विनियोग पध्दती, उत्सवामधील अनुषंगिक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन, रोषणाईव इतर बाबींमध्ये जाणवलेल्या विशेष बाबी आदी गोष्टी विचारात घेतल्या जाणार आहेत.
स्पर्धा परीक्षणामधून सर्वोत्कृष्ट देखावा, विषयास अनुरूप समाजप्रबोधनात्मक नाविन्यपूर्ण सजावट, सर्वोत्कृष्ट आकर्षक मूर्ती आणि स्वच्छता – शिस्तबध्दता या 4 क्षेत्रांतर्गत प्रत्येकी 5 पारितोषिके दिली जाणार आहेत. याशिवाय या सर्व क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम ठरणा-या 5 गणेशोत्सव मंडळांना नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळे म्हणून पारितोषिकाने सन्मानीत केले जाणार आहे. स्पर्धा परीक्षणात इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करणा-या मंडळांना प्राधान्य दिले जाणार आहे.
स्पर्धा सहभाग अर्ज सादर केलेल्या संस्था / मंडळास स्पर्धा परीक्षक समिती एकदाच भेट देतील त्यावेळी देखावा संपूर्ण तयार असणे आवश्यक आहे. स्पर्धा प्रवेशिका नवी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयात विहित नमुन्यात दि. 20/08/2017 पर्यंत संपूर्ण भरुन देणे आवश्यक आहे.
तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना आपल्या घरातील तसेच गणेशोत्सव मंडळांनी सार्वजनिक रित्या साजरा होणारा यावर्षीचा श्रीगणेशोत्सव पर्यावरणशील साहित्याचा वापर करून साजरा करावा असे आवाहन नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे व महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या वतीने करण्यात येत आहे.